‘एकनाथ शिंदे, धनखड यांच्याबरोबर जे झालं तेच आता…’; उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर तेजस्वी यादव यांचं मोठं विधान
जगदीप धनखड यांनी सभागृहाचं कामकाज चांगले चालवलं, त्यामुळे रात्री त्यांचा राजीनामा येणं आश्चर्यकारक आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की राजीनामा देण्यात आला की घेण्यात आला. जर आरोग्याचा प्रश्न असेल तर ते अधिवेशनापूर्वीच राजीनामा देऊ शकले असते, पण राजीनामा घेण्यात आल्याची चर्चा आहे, त्याचे कारण काय, हे फक्त तेच चांगले सांगू शकतात… मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या प्रकृतीबद्दलही बातम्या येत आहेत, जर जगदीप धनखड राजीनामा देऊ शकतात तर प्रश्न असा उद्भवतो की अशी कोणती सक्ती आहे की भाजप नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवत आहे. जगदीप धनखड यांच्यासोबत जे घडले ते निवडणुकीनंतर नितीश कुमार यांच्यासोबत होईल, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे घडले ते नितीश कुमार यांच्यासोबत होईल, असं राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.
मोठी बातमी! मतदार यादीतून तब्बल ५१ लाख मतदारांची नावं वगळणार, बिहारच्या राजकारणात खळबळ
बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक दिलेल्या राजीनाम्याने चर्चांना नवा रंग दिला आहे. धनखड यांनी सोमवारी (२१ जुलै) रात्री उशिरा, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे सादर केला. या निर्णयामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, मुदतीपूर्वीच उपराष्ट्रपतीपद रिक्त झाले आहे.
या पार्श्वभूमीवर बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी धनखड यांच्या राजीनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी आश्चर्य व्यक्त करत म्हटलं की, “पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यांनी व्यवस्थित कामकाज चालवले. अचानक राजीनामा दिल्याचं कळालं. हा राजीनामा त्यांनी दिला की घेतला गेला, हा संशय आहे. जर प्रकृती खालावली असेल, तर अधिवेशन सुरू होण्याच्या आधीही ते राजीनामा देऊ शकले असते. चर्चा अशी आहे की राजीनामा ‘घेतला’ गेला आहे.”
तेजस्वी यादव यांनी यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजकीय भविष्याबाबतही मोठं भाकीत वर्तवलं. “मुख्यमंत्री अचेत अवस्थेत आहेत, त्यांच्या आरोग्याबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. भाजपा निवडणुकीपर्यंतच त्यांना मुख्यमंत्रीपदावर ठेवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नितीश कुमार यांच्यासोबतही धनखड यांच्यासारखंच होईल. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंबरोबर जे घडलं, तेच बिहारमध्ये घडू शकतं. कारण अमित शहा यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल, हे वेळच ठरवेल,” असं तेजस्वी म्हणाले.
कशी असते उपराष्ट्रपतीपदाची निवड प्रक्रिया? कोण करतं निवड? वाचा सविस्तर
धनखड यांच्या राजीनाम्यामुळे नव्या उपराष्ट्रपतीच्या शोधाला वेग आला आहे. दरम्यान, नितीश कुमार यांना दिल्लीतील मोठ्या भूमिकेसाठी, उपराष्ट्रपतीपदासाठी, तयार करण्यात येत असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वादळ किती वाढेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.