
थंडीची सुरुवात ! हिमाचल प्रदेशातील ताबोत तापमान पोहोचले उणे 2 अंशांपर्यंत; राजस्थानमध्येही तापमान घसरले
नवी दिल्ली : नोव्हेंबर सुरु होताच वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. देशातील अनेक राज्यांतील तापमान घसरताना दिसत आहे. उत्तर भारतात हिवाळा वाढला आहे. हिमाचल आणि राजस्थानमध्ये तापमान सातत्याने कमी होत आहे, तर पश्चिम बंगालमध्येही पुढील काही दिवसांत थंडी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. हिमाचल प्रदेशातील ताबो येथे किमान तापमान -2.0 अंश सेल्सिअस आणि कुकुमसेरी येथे किमान तापमान -2.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
हवामान विभागाच्या (आयएमडी) मते, वायव्येकडील वाऱ्यांमुळे, येत्या आठवड्यात राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागात, डोंगराळ राज्यांसह थंडीची तीव्रता वाढू शकते. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत किमान तापमानात आणखी दोन ते तीन अंशांनी घट होण्याची अपेक्षा आहे. राजस्थानमधील सीकर हे सर्वात थंड ठिकाण राहिले आहे. जयपूर हवामान केंद्राने शुक्रवारी रात्री राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील किमान तापमान सात अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याची माहिती दिली, जे या हंगामातील सर्वात कमी आहे.
फतेहपूर येथे ७.४ अंश सेल्सिअस, अजमेर येथे ८.१ अंश सेल्सिअस, अलवर येथे ८.५ अंश सेल्सिअस, लंकरणसर येथे ८.७ अंश सेल्सिअस, चुरू येथे ९.३ अंश सेल्सिअस, पिलानी येथे ९.५ अंश सेल्सिअस आणि झुनझुनू येथे ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पश्चिम राजस्थानमधील बारमेर जिल्हा सर्वाधिक उष्ण राहिला, येथे कमाल तापमान ३४.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
…म्हणून राजस्थानमध्ये हवामान राहील कोरडे
हवामान विभागाने सांगितले की, हरियाणा आणि आसपासच्या भागात वरच्या हवेचे चक्रीवादळ कमकुवत झाले आहे, ज्यामुळे राजस्थानमध्ये हवामान कोरडे राहील. पुढील आठवड्यात राज्यात पावसाचा अंदाज नाही आणि तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही.
चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशला बसला होता फटका
मोंथा चक्रीवादळ यापूर्वी अनेक राज्यांत येऊन गेले. याचा फटका केवळ आंध्र प्रदेश, बिहार राज्यांना नाहीतर आसपासच्या राज्यांनाही बसला होता. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशामध्ये चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले होते. आंध्र प्रदेशात तीन जणांचा मृत्यू झाला. 42 गुरे मृत्युमुखी पडली आणि सुमारे १.५ लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता थंडीची लाट येत असल्याचे समोर आले आहे. तापमान उणे २ पर्यंत जाताना दिसत आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Winter Alert: रेनकोट काढून स्वेटर घाला! राज्यात हुडहुडी वाढणार; ‘या’ दिवसापासून….