नवी दिल्ली : सध्या आपण अशा कालखंडात आहोत की जो भारताचा अमृतकाळ आहे. या कालखंडात आपण जे करु, जी पावलं उचलू, जितका त्याग करु, एका पाठोपाठ एक निर्णय घेऊ. त्यानंतर येणाऱ्या एक हजार वर्षांचा इतिहास त्यामुळे लिहिला जाणार आहे. पुढच्या हजार वर्षांवर आजच्या घटनांचा प्रभाव राहणार आहे. नव्या आत्मविश्वासाने आपला देश पुढे जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे देशाला सलग दहाव्यांदा संबोधित केले. काँग्रेस वगळता इतर पक्षाचे पंतप्रधान म्हणून दहाव्यांदा संबोधन करणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. आज भाषणाला सुरुवात करत असतानाच पंतप्रधान मोदींनी देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या सगळ्याच स्वातंत्र्यवीरांना नमन करुन देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ते म्हणाले, राष्ट्र निर्माणासाठी नवी प्रेरणा, नवे संकल्प आपण करत आहोत. आज माझ्या कुटुंबाला म्हणजेच माझ्या देशाला मी सांगू इच्छितो की नैसर्गिक संकटांमुळे देशात अनेक ठिकाणी आपत्ती आल्या. या आपत्ती ज्यांना सहन कराव्या लागल्या मी त्या सगळ्यांच्या प्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. राज्य आणि केंद्र सरकार त्यांच्या पाठिशी आहे हा विश्वास त्यांना देऊ इच्छितो.