Vice President Election : 'देश तुमच्या बोलण्याची वाट पाहतोय'; जगदीप धनखड यांच्या मौनावर काँग्रेस आक्रमक
नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी जुलै महिन्यात उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला होता. धनखड यांनी अचानक अशाप्रकारे राजीनामा दिल्याने विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. राजीनामा दिल्यापासून धनखड यांनी एकदाही उघडपणे भाष्य केले नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष लागले आहे. त्यातच आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘देश त्यांच्या बोलण्याची वाट पाहत आहे’, असे म्हणत धनखड यांच्या मौनावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले.
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसने म्हटले की, ‘माजी उपराष्ट्रपती गेल्या 50 दिवसांपासून असामान्य मौन पाळत आहेत आणि देश त्यांच्या बोलण्याची वाट पाहत आहे’. दरम्यान, जुलैमध्ये जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर आज उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होत आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे सी.पी. राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत आहे. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला संख्याबळानुसार स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे.
असे असताना धनखड यांच्या मौनावर काँग्रेसने सवाल उपस्थित केले आहेत. सरचिटणीस आणि संपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये धनखड यांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला. ‘धनखड यांनी गेल्या ५० दिवसांपासून असामान्य मौन पाळले आहे. आज, जेव्हा उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, तेव्हा देश त्यांच्या अभूतपूर्व आणि अनपेक्षित राजीनाम्यानंतर त्यांच्या विधानाची वाट पाहत आहे’.
दरम्यान, मोदी सरकारकडून शेतकऱ्यांकडे होत असलेल्या घोर दुर्लक्ष आणि सत्तेत असलेल्यांच्या अहंकारामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबद्दल चिंता व्यक्त करून धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा असल्याचे म्हटले आहे. मात्र, धनखड यांनी राजीनामा देताना प्रकृतीचे कारण दिले होते.
एनडीए-इंडिया आमनेसामने
जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक आज होत आहे. विरोधी गटातील इंडिया आघाडी व सत्ताधारी एनडीएने सोमवारी जोरदार तयारी केल्याचे दिसून आले. सत्ताधारी एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन विरूद्ध इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या निवडणुकीची मतमोजणी आजच होणार आहे. त्यानुसार, आज देशाला नवे उपराष्ट्रपती मिळणार आहेत.