
देशात सध्या तीव्र उष्णतेचे वारे वाहत आहे. अनेक शहरांमधील तापमान 45 अंशांवर गेले आहे. या उष्णतेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. त्यातच उत्तर प्रदेशातील तापमान ४७ अंशांच्या पुढे गेले आहे. अशातच उष्णतेच्या लाटेमुळे उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील मालगाडीच्या लोको पायलटची प्रकृती खालावल्याचे समोर आले. कारण रेल्वेच्या इंजिनमधील तापमान 55 अंशांच्या आसपास पोहोचले होते. शिवाय, सतत 9 तासांच्या ड्युटीमुळे लोको पायलटला मळमळ आणि चक्कर येऊ लागली. त्यामुळे तो बेशुद्ध ही पडला, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
या घटनेची
माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून लोको पायलटला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोको पायलटची तब्येत अचानक बिघडल्याने मालगाडी सुमारे अडीच तास महोबा स्थानकावर उभी होती. दुसरा लोको पायलट आल्यानंतर मालगाडी महोबा ते बांदा येथे पाठवता आली.
विशेष म्हणजे बुंदेलखंडमधील महोबा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेबाबत हवामान खात्याने आधीच अलर्ट जारी केला होता. ज्याचा परिणाम सामान्य जनजीवनावर दिसून येत आहे. महोबा जिल्ह्यात तापमान ४८ अंशांच्या आसपास पोहोचल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. या कडाक्याच्या उन्हामुळे झाशीहून बांदा येथे जाणाऱ्या मालगाडीच्या लोको पायलटची प्रकृतीही बिघडल्याचे समोर आले.
त्यांची तब्येत अचानक बिघडत असल्याचे पाहून मालगाडी महोबापूर्वी कुलपहार स्थानकावर थांबवण्यात आली. लोको पायलट विनोद कुमार यांनी त्यांच्या वरिष्ठांना तब्येत बिघडलेल्या स्थितीबद्दल माहिती दिली. ज्यावर अधिकाऱ्यांनी कोणत्याही मार्गाने मालगाडी महोबा रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यास सांगितले. अशा स्थितीत चक्कर आल्यासारखे वाटत असतानाही मालगाडी महोबा स्थानकावर पोहोचण्याचे काम लोको पायलटनी केलं. रुग्णवाहिकेच्या मदतीने आजारी लोको पायलटला महोबा जिल्हा रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
इमर्जन्सी वॉर्डमध्ये ड्युटीवर असलेले डॉ. विष्णू सांगतात की, लोको पायलटला दाखल करण्यात आले आहे, जो प्रचंड उष्णतेमुळे उलट्या आणि चक्कर आल्याने बेशुद्ध झाला होता. त्यावर उष्णतेच्या लाटेचा परिणाम दिसून आला आहे. त्यांना दाखल करून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.