thousand year old skeleton found in 2019 now in Vadnagar Museum
Samadhi wale Babaji Vadnagar skeleton : गुजरातच्या प्राचीन इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. २०१९ मध्ये वडनगर येथे उत्खननात सापडलेला १००० वर्षांपूर्वीचा एक दुर्मीळ सांगाडा, ज्याला स्थानिक लोक ‘समाधी वाले बाबा’ म्हणून ओळखतात, त्याला अखेर एक सुरक्षित आणि सन्माननीय ‘घर’ मिळाले आहे. या अद्भुत सांगाड्याला अलीकडेच नव्याने स्थापन झालेल्या वडनगर पुरातत्त्व अनुभव संग्रहालयात हलविण्यात आले आहे.
१५ मे रोजी सायंकाळी, पाच तासांच्या नियोजित आणि संयमित प्रयत्नांनंतर, हा पुरातन सांगाडा संग्रहालयात स्थानांतरित करण्यात आला. या प्रक्रियेत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) व गुजरात राज्य पुरातत्त्व विभागाचे १५ हून अधिक तज्ज्ञ सहभागी होते. क्रेनच्या साहाय्याने अत्यंत काळजीपूर्वक सांगाडा तंबूतून बाहेर काढण्यात आला आणि एका विशेष ट्रेलरमधून संग्रहालयात हलवण्यात आला. हा सांगाडा यापूर्वी २०१९ पासून मेहसाणा जिल्ह्यातील जुन्या वडनगरच्या बाहेर एका तात्पुरत्या तंबूत संरक्षित ठेवण्यात आला होता. सुरुवातीला ते सरकारी निवासस्थानाच्या कॉरिडॉरमध्ये, आणि नंतर १२x१५ फूट आकाराच्या ताडपत्री व कापडी तंबूत ठेवण्यात आले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताच्या हाती ‘ड्रॅगनचा खजिना’; चीनच्या गुप्त लष्करी तंत्रज्ञानावर जगाची नजर, ‘Five Eyes’ आणि फ्रान्सकडूनही मागणी
या सांगाड्याचा एक विशेष उल्लेख म्हणजे त्याची समाधीस्थित बसण्याची मुद्रा. ‘हेरिटेज: जर्नल ऑफ मल्टीडिसिप्लिनरी स्टडीज इन आर्कियोलॉजी’मध्ये प्रकाशित शोधनिबंधानुसार, हा सांगाडा एका खोल खड्ड्यात क्रॉस-पायाच्या स्थितीत बसलेला आहे. डोकं उत्तरेकडे असून, उजवा हात मांडीवर तर डावा हात छातीपर्यंत उंचावलेला आहे. ही मुद्रा योगी अथवा तपस्वी अवस्थेची आठवण करून देणारी असून, तज्ञांचे मत आहे की, यातील व्यक्तीला ‘समाधी’ स्थितीत पुरण्यात आले असावे.
या विशिष्ट पुरातत्त्वीय रचनेमुळे सांगाड्याचे महत्त्व आणखी वाढते. अभ्यासक अभिजित आंबेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नमूद केले आहे की, ही दफन प्रथा ९व्या-१०व्या शतकात गुजरातमध्ये सर्व धर्मांमध्ये आढळून येत होती.
सध्या हा सांगाडा संग्रहालयाच्या तळमजल्यावरील स्वागत क्षेत्राजवळ ठेवण्यात आला आहे. त्याभोवती सावधगिरीची बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. क्युरेटर महिंदर सिंग सुरेला यांनी सांगितले की, “सध्या सांगाडा प्रदर्शनासाठी खुले नाही. पण लवकरच संवर्धन आणि तपासणी पूर्ण झाल्यावर, तो संग्रहालयाच्या गॅलरीत ठेवण्याची योजना आखली जाईल.”
हा सांगाडा केवळ एक हाडांचा अवशेष नाही, तर तो गुजरातच्या प्राचीन धार्मिक व आध्यात्मिक परंपरांचे द्योतक आहे. समाधीस्थित पुरलेली व्यक्ती कोण होती, ती कोणत्या पंथाची होती, आणि त्या काळी या प्रकारची दफन प्रथा कशी रूढ होती – यावर अजूनही संशोधन सुरू आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भीतीमुळे पाकिस्तानी सैन्याचे धाबे दणाणले; बलुचिस्तान नियंत्रणाबाहेर अन् स्वातंत्र्याची घोषणा
वडनगर संग्रहालय हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुरातत्त्व अनुभव देणारे भारतातील पहिले संग्रहालयांपैकी एक आहे. ‘समाधी वाले बाबांचा’ हा सांगाडा इथे आल्यामुळे संग्रहालयाच्या संग्रहात एक अनमोल भर पडली आहे. या निर्णयामुळे, गुजरातच्या सांस्कृतिक वारशाचे एक अद्वितीय प्रतिक आता भविष्यातील अभ्यासकांसाठी आणि पर्यटकांसाठी सुलभ आणि संरक्षित स्वरूपात पाहता येणार आहे. हा सांगाडा इतिहास, अध्यात्म आणि पुरातत्त्व यांचा मिलाफ दर्शवतो, आणि त्यातून भारतातील समृद्ध आणि बहुपेडी सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडते.