इस्लामाबाद/क्वेटा – भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची स्थिती ढासळलेली असताना बलुचिस्तानमधील हालचालींनी इस्लामाबादची चिंता आणखी वाढवली आहे. बलुच नेत्यांनी पाकिस्तानपासून पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली असून, पाकिस्तानचा या प्रदेशावरचा ताबा आता केवळ कागदोपत्री उरलेला आहे. बलुचिस्तानच्या जवळपास ७० ते ८० टक्के भूभागावर पाकिस्तानी सरकारचे नियंत्रण राहिलेले नाही, असा गंभीर दावा अमेरिकास्थित बलुच प्रतिनिधी रझाक बलुच यांनी केला आहे.
पाक सैन्याची कोंडी, क्वेटाच्या बाहेरही जाण्याची भीती
रझाक बलुच यांनी ‘TAG TV’ ला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानच्या सैन्याची दयनीय स्थिती उघड केली आहे. “अंधार पडल्यानंतर पाकिस्तानी सैन्य क्वेटामधून बाहेरही पडत नाही,” असे ते म्हणाले. रात्रीच्या वेळी सैन्य रस्ते मोकळे करून घेतं, पण गस्त घालण्याचीही हिंमत करत नाही. ते पुढे म्हणाले की, “पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनीही आताशा ही स्थिती गुपचूप मान्य केली आहे.”
स्वातंत्र्याची घोषणा आणि भारताला आवाहन
बलुच स्वातंत्र्य चळवळीने आता सार्वजनिक रूप धारण केले असून, बलुचिस्तानचे नेते मीर यार बलोच आणि इतर कार्यकर्त्यांनी स्वतंत्र बलुच राष्ट्राची घोषणा केली आहे. रझाक बलुच यांनी भारत आणि अमेरिका यांच्याकडे राजकीय आणि धोरणात्मक पाठिंब्याचे आवाहन केले आहे. “जर भारताने आम्हाला साथ दिली, तर बलुचिस्तान भारतासाठी खुले होईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
ते पुढे म्हणाले, “भारत, अमेरिका आणि अन्य लोकशाही देशांनी बलुच स्वातंत्र्यलढ्याला मान्यता द्यावी आणि आमच्या प्रतिनिधींना स्वीकारावे.” त्यांनी इशारा दिला की, “जर मदत उशिरा मिळाली, तर एक क्रूर सैन्यसत्ता उदयास येईल, जी संपूर्ण उपखंडासाठी धोकादायक ठरेल.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Sperm Doner: सिरीयल स्पर्म डोनर! 180 हून अधिक मुलांचा बाप महिलांविरुद्ध रचत होता मोठा कट
‘बांगलादेशप्रमाणे पळून जावे लागेल’ – पाक सैन्याला इशारा
रझाक बलुच यांनी पाकिस्तानच्या सैन्याला कडक इशारा देत म्हटले की, “बांगलादेशप्रमाणे अनवाणी पळून जाण्याऐवजी सन्मानाने माघार घ्या.” त्यांनी बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तूनख्वा या प्रांतांमध्ये पाक लष्कराची दडपशाही थांबवण्याची मागणी केली.
बलुच लिबरेशन आर्मीचे हल्ले, चीनही लक्ष्य
गेल्या काही महिन्यांत बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान लष्करावर आणि चीनच्या गुंतवणुकीवर जोरदार हल्ले चढवले आहेत. चिनी प्रकल्पांचे सतत उद्ध्वस्त होणे हे बीजिंगसाठीही मोठी डोकेदुखी ठरत आहे. पाकिस्तान-चीन आर्थिक मार्ग (CPEC) बलुचिस्तानमधूनच जात असल्याने हा भाग पाकिस्तानसाठी धोरणात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. मीर यार बलोच यांनी सोशल मीडियावरून स्पष्ट संदेश दिला की, “बलुचिस्तान पाकिस्तान नाही.” त्यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे समर्थन करत म्हटले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्ही एकटे नाही आहात, बलुच देशभक्त तुमच्या सोबत आहेत.”
नवीन बंगलादेशाची चाहूल?
विश्लेषकांच्या मते, बलुचिस्तानमधील ही स्वातंत्र्याची चळवळ केवळ दहशतवादी किंवा फुटीरवादी हालचाल न राहता राजकीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उचल घेण्यास तयार झाली आहे. 1971 मध्ये बंगलादेश ज्या मार्गाने स्वतंत्र झाला, त्या धर्तीवर बलुचिस्तानची वाटचाल सुरू आहे, असेही काही राजकीय निरीक्षक सूचित करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इशाक दार यांचा खोटारडेपणा उघड; AI-निर्मित बातमीचा हवाला देत पाक लष्कराचे खोटे कौतुक, ‘डॉन’ने केला पर्दाफाश
ऑपरेशन सिंदूर
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानला लष्करी आणि रणनीतिक स्वरूपात मोठा धक्का बसला आहे. बलुचिस्तानमधील स्वातंत्र्याच्या घोषणांनी पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांची झोप उडवली आहे. भारतासमोर आता धोरणात्मक संधी आहे – बलुच स्वातंत्र्याला मदत करून केवळ पाकिस्तानलाच नाही, तर चीनलाही पश्चिमेकडून अडचणीत आणण्याचा मार्ग खुला होतो. भविष्यात या चळवळीचा उपखंडाच्या राजकारणावर खोलवर परिणाम होण्याची शक्यता आहे.