Waqf Amendment Bill : मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्या जेडीयू, टीडीपीमध्ये अस्वस्थता; 'या' पाच नेत्यांनी सोडली साथ
नवी दिल्ली : वक्फ विधेयकावर संसदेच्या मंजुरीची मोहोर उमटली आहे. अपेक्षेप्रमाणे नितीश कुमार यांचा जदयू तर चंद्राबाबू नायडूंचा तेलुगु देसम पक्ष विधेयकाच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. मतदानही बाजूनेच केले. पण आता त्यामुळे त्यांच्यासमोर पक्षांतर्गत आव्हाने निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे आगामी काळात या विधेयकाचे ‘साईड इफेक्ट्स’ भाजपच्या या दोन्ही मित्रपक्षांना सहन करावे लागण्याची शक्यता आहे.
लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतरच या दोन्ही पक्षांमधील अस्वस्थता समोर येऊ लागली. या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या बिहारमध्ये सत्ताधारी जदयूमधील दोन प्रभावी मुस्लीम नेत्यांनी पक्षाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. नितीश कुमार यांना धक्का देत जदयुच्या पाच मुस्लीम नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या मंजुरीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षात खळबळ उडाली आहे.
नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये बंडखोरी सुरू झाली आहे. पक्षातून एकामागून एक मुस्लिम नेत्यांचे राजीनामे सुरूच आहेत. वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्याने संतप्त झालेल्या पाच मुस्लिम नेत्यांनी पक्ष सोडला आहे.
या नेत्यांनी सोडली पक्षाची साथ
वक्फ विधेयकाला पाठिंबा दिल्याने जदयूच्या अल्पसंख्याक सेलचे राज्य सचिव मोहम्मद शाहनवाज मलिक, प्रदेश सरचिटणीस सई मोहम्मद, तबरेज सिद्दीकी अलिग, भोजपूरचे पक्षाचे सदस्य मोहम्मद दिलशान रैन आणि मोहम्मद कासिम अन्सारी यांनी पक्षाशी संबंध तोडले आहेत. जेडीयूने मुस्लिम समाजाचा विश्वास तोडला असून, हे पाऊल धर्मनिरपेक्ष प्रतिमेच्या विरोधात असल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे. मात्र, पक्षाने हे दावे फेटाळून लावले आहेत.
तेलगू देसम पार्टीची सावध भूमिका
चंद्राबाबूंच्या तेलुगु देसम पक्षातून सावधपणे अस्वस्थता व्यक्त होत आहे. पक्षाच्या काही नेत्यांनी विधेयकातील काही तरतुदींवर आक्षेप नोंदवला असला तरी चंद्राबाबू नायडूंनी आमच्या शंकांचे निरसन होईल, असा शब्द दिल्याचे या सदस्यांचे म्हणणे आहे. तेदपा व जदयू या दोन्ही पक्षांची आंध्र प्रदेश व बिहार या राज्यांमध्ये सत्ता आहे. या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लीम समुदाय आहे. त्यामुळे वक्फ विधेयकावरील या दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या भूमिकेचे त्या त्या राज्यांत पडसाद उमटण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
टीडीपीमध्येही विरोध होणार?
तेलुगु देसम पक्षानं संसदेत विधेयकातील एका तरतुदीत सुधारणेची मागणी करताना विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यात बिगर मुस्लीम व्यक्तींच्या वक्फमधील समावेशाचा मुद्दा होता. तर दुसरीकडे जदयूने कोणत्याही सुधारणेशिवाय विधेयकाला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. पण दोन्ही पक्षांनी चर्चेदरम्यान मुस्लीम समुदायासाठीची आपली बांधिलकी अधोरेखित केली. दरम्यान, जदयूप्रमाणेच चंद्राबाबूंच्या तेदपामधूनही हळूहळू विरोध जाहीर होऊ लागला आहे.