उंच उंच पर्वत, खळखळणारे धबधबे, हिरवीगार पठारं, पर्यटकांची पहिली पसंती; तरीही उत्तराखंडमधील ५ जिल्हे का आहेत धोकादायक?
हिमालयाच्या कुशीत वसलेलं उत्तराखंड राज्य निसर्गसौंदर्याचं जणू वरदानच आहे. डोंगराळ रस्ते, घनदाट जंगलं, थंड हवामान, पाढंऱ्याशुभ्र वाहणाऱ्या नद्या, धबधबे आणि पर्वतरांगांमधील शांतता, पर्यटकांनी इथे खेचून आणते. पण गेल्या काही वर्षांमध्ये या राज्याला निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करावा लागला आहे. अचानक भूस्खलन होणं, ढगफुटी, नद्यांचे प्रवाह बदलणं.घरांच्या भीतींवर पडणाऱ्या भेगा, कधी डोंगरातून कोसळणारे दगड, यामुळे उत्तराखंडमधील काही जिल्ह्यांमध्ये जगणं असुरक्षित झालं आहे. यामध्ये उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर आणि पिथौरागढ या जिल्ह्यांचा उल्लेख विशेषतः केला जातो. हे जिल्हे सर्वाधिक धोकादायक मानले जातात.
उत्तरकाशीतील दुर्घटनेत भारतीय सैन्याचे १० जवान बेपत्ता; हेलिपॅड, लष्करी छावणीचंही नुकसान
हिमालयाच्या उंचशिखरांमध्ये वसलेलं उत्तराखंड भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या अतिशय अस्थिर मानलं जातं. इथले डोंगर हे निसर्गनिर्मित तर आहेत, पण अजूनही भौगोलिकदृष्ट्या ‘तरुण’ अवस्थेतील मानले जातात. म्हणजेच त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्यामुळेच या डोंगरांमध्ये अस्थिरता, भूस्खलन आणि भूकंप होण्याचा धोका अधिक असतो. शिवाय मानवी हस्तक्षेप – जसं की मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली जलविद्युत प्रकल्पांची उभारणी, रस्ते, बोगदे आणि अवाजवी खाणकाम, यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे.
उत्तरकाशी – ढगफुटी आणि नद्यांचा प्रकोप
उत्तरकाशी हे जिल्हा हिमालयाच्या अगदी खोल भागात आहे. इथून भागीरथी, अलकनंदा, मंदाकिनी, धौलीगंगा आणि यमुना या प्रमुख नद्या वाहतात. पावसाळ्यात या नद्या प्रचंड वेगाने वाहतात आणि काठावरील गावांना धोका निर्माण होतो. याशिवाय, दरवर्षी ढगफुटी आणि भूस्खलनाच्या अनेक घटना येथे घडतात. अस्थिर डोंगररांगा, जलवायूतील बदल आणि अनियंत्रित बांधकामं या सगळ्यांचा मिळून विपरीत परिणाम होत आहे.
चमोली – हिमनद्या वितळतायेत
2021 मधील चमोलीमधील महाभयंकर बर्फखाचाळीचं (glacial burst) उदाहरण अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. एका मोठ्या खडकाच्या तुटक्यामुळे आणि हिमनदीच्या पिघळण्यामुळे आलेल्या पुराने अनेकांचा जीव गेला आणि कोट्यवधींचं नुकसान झालं. चमोली जिल्ह्यात हिमनद्या आणि उंचावरील अनेक तलाव आहेत, जे हवामान बदलामुळे वेगाने वितळत आहेत. तसंच येथे सुरू असलेले जलविद्युत प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणावर खाणकाम यामुळे डोंगरांचे संतुलन बिघडतंय.
रुद्रप्रयाग – अलकनंदा आणि मंदाकिनीचा संगम, पण धोका कायम
रुद्रप्रयाग जिल्हा दोन महत्त्वाच्या नद्यांच्या संगमावर वसलेला आहे – अलकनंदा आणि मंदाकिनी. या नद्या पावसाळ्यात पुराच्या स्थितीत येतात. त्यामुळे दरवर्षी अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलन होतं. रस्ते खचतात, वाहतूक बंद होते आणि पर्यटकांसाठी तसेच स्थानिकांसाठीही संकट निर्माण होतं.
बागेश्वर – खाणकामामुळे डोंगर पोखरले
बागेश्वर जिल्हा भूगर्भीयदृष्ट्या ‘Zone V’ म्हणजेच सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतो. पण याहून अधिक चिंता निर्माण करणारी गोष्ट म्हणजे इथं होणारं सोपस्टोन आणि मॅग्नेसाइटचं अवैध खाणकाम. या खाणकामामुळे डोंगर पोखरले गेले आहेत, अनेक घरांमध्ये दराड्या पडल्या आहेत, आणि जलस्रोतही आटत चाललेत. त्यामुळे कोर्टाने येथे खाणकामावर बंदी घातली आहे. पण परिस्थिती सुधारली आहे, असं म्हणता येत नाही.
ढगफुटीत उद्ध्वस्त झालेलं उत्तराखंडमधील धराली गाव नक्की कसं आहे? लोखो पर्यटकांचं का आहे आवडतं ठिकाण?
पिथौरागढ
पिथौरागढ हे देखील डोंगराळ आणि अस्थिर भूभागात येतं. इथं जोरदार पावसामुळे जमिनीचा कटाव होतो, आणि त्यातून भूस्खलनाच्या मोठ्या घटना घडतात. काळी नदीसारख्या नद्यांचा प्रवाहामुळे देखील डोंगरांची झीज होते. इथला मानवी हस्तक्षेप – बांधकामं, रस्ते, खाणकाम – यामुळे नैसर्गिक संतुलन ढासळलं आहे. परिणामी, दरवर्षी अनेक गावं संकटात सापडतात.
उत्तराखंडसारख्या निसर्गदत्त सौंदर्याने नटलेल्या राज्याला आज हवामान बदल, मानवी हस्तक्षेप आणि दुर्लक्षित नियोजन यांचा त्रास भोगावा लागत आहे. पर्यटन जितकं आवश्यक आहे, तितकंच या नाजूक परिसंस्थेचं जतन आवश्यक आहे .