लडाख हिंसाचार सुरुच; लेहमध्ये चौथ्या दिवशीही कर्फ्यू, जीवनावश्यक वस्तूंचा जाणवतोय तुटवडा
नवी दिल्ली : लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी सुरू असलेल्या निषेधाला बुधवारी हिंसक वळण मिळाले. हिंसाचारात चार जणांना आपले प्राण गमवावे लागले. कर्फ्यू दरम्यान गृह मंत्रालयाचे एक पथक शुक्रवारी लेहमध्ये पोहोचले.
मंत्रालयाचे अधिकारी सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यांनी लडाखचे नायब राज्यपाल, नागरी आणि पोलिस अधिकारी आणि लेह उच्च न्यायालयाच्या प्रतिनिधींसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. कर्फ्यूमुळे लेहमध्ये दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक भागात रहिवाशांना रेशन, दूध आणि भाज्यांसह जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत असल्याचे वृत्त आहे. लेहचे जिल्हा दंडाधिकारी रोमिल सिंग डोंक यांनी सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हेदेखील वाचा : Leh Protest: लडाखमधील हिंसेनंतर प्रशासनाची मोठी कारवाई; सोनम वांगचूक यांना अटक
दरम्यान, अंगणवाडी केंद्रे देखील बंद राहतील. यात अनेक जण जखमी आहेत. यातील जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे आणि सुमारे 27 रुग्णांना एसएनएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लेह शहरातील सध्याची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, हिंसक निदर्शने आणि वाढत्या राजकीय तणावामुळे जनतेत मोठी चिंता आहे.
कारगिलमध्ये सामान्य जीवन पुन्हा सुरू झाले, दुकाने पुन्हा सुरू झाली आणि ग्राहक परतले आहेत. लडाखमधील निदर्शनांच्या समर्थनार्थ पूर्ण बंदनंतर शुक्रवारी कारगिल शहरात सामान्य जीवन पुन्हा सुरू झाले. दिवसभराच्या बंदनंतर दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या.
संवेदनशील भागात मोठा पोलिस बंदोबस्त
कोणताही गोंधळ टाळण्यासाठी संवेदनशील भागात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कारगिलमधील व्यापाऱ्यांनी सकाळी त्यांची दुकाने उघडली आणि सामान्य व्यावसायिक व्यवहार पुन्हा सुरू झाले. ग्राहकांनी बाजारपेठांमध्ये सावधगिरीने बाहेर पडले.