इम्फाळ : मणिपुरात मैतेई आणि कुकी समाजात हिंसक घटना पुन्हा वाढू लागल्या आहेत. बुधवारी रात्री बिष्णुपूर जिल्ह्यात बॉम्बस्फोट आणि गोळीबाराची घटना घडली होती. ही घटना जिल्ह्यातील कुंबी आणि थौबल जिल्ह्यातील वांगू दरम्यान घडली.
ज्या परिसरात गोळीबार झाला त्या परिसरात अद्रकची कापणी करणारे चार जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी तिघांचे मृतदेह गुरुवारी पोलिसांना आढळून आले. तिघांचेही मृतदेह चुराचांदपूर जिल्ह्यातील जंगलात आढळले. दरम्यान चौथ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांना जंलात इम्बोचा सिंह, आनंद सिंह व रोमेन सिंह यांचे मृतदेह आढळले असून दारा सिंहचा शोध घेतला आहे. यांची बंडखोरांनी हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गोळीबार आणि बॉम्बस्फोटाच्या घटनेदरम्यान, हे चारही नागरिक बेपत्ता झाले होते.
पॉवर स्टेशनमधून इंधन गळती
मणिपुरातील लीमाखाँग पॉवर स्टेशनमधून इंधनाची मोठ्याप्रमाणात गळती झाली असून ते अनेक नद्यांमध्ये विसर्ग झाल्याचे समोर आले आहे. ही माहिती मिळताच मणिपूर सरकारने सर्व संबंधित विभागांना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले. इम्फाळच्या खोऱ्यातून जाणाऱ्या नाल्यांमध्येही इंधन पसरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. व्हिडीओ फुटेजमध्ये इंधन भरलेल्या नाल्यांमध्ये अधिकारी गळतीनंतर काठी हलवताना दिसले.