कशी असते उपराष्ट्रपतीपदाची निवड प्रक्रिया? कोण करतं निवड? वाचा सविस्तर
उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या नाट्यमय घडामोडीनंतर देशाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या घटनात्मक पदावर कोण विराजमान होणार, याकडे देशाचे लक्ष लागलं आहे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, राज्यसभेचे कामकाज कोण पाहणार? आणि नवीन उपराष्ट्रपतीची निवड प्रक्रिया कधी पूर्ण होणार? कशी असते निवड प्रक्रिया? कोण करतं निवड? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया…
नितीश कुमार बनणार नवे उपराष्ट्रपती? भाजप नेत्याने नाव सूचवताच चर्चांना उधाण
निवड होईपर्यंत कोणाकडे असणार जबाबदारी?
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ९१ नुसार, उपराष्ट्रपतीपद रिक्त असेल तर राज्यसभेच्या उपाध्यक्षाला कार्यवाह अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात येते. त्यामुळे सध्या राज्यसभेचे उपाध्यक्ष असलेले हरिवंश नारायण सिंह राज्यसभेचं कामकाज पाहणार आहेत. जेडीयूचे खासदार असलेले हरिवंश सिंह 2020 पासून या पदावर आहेत.
नवीन उपराष्ट्रपतीची निवडप्रक्रिया
उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर नवीन उपराष्ट्रपतीची निवड ६० दिवसांच्या आत पार पाडावी लागते. म्हणजेच १९ सप्टेंबरपूर्वी ही निवड पूर्ण होणं बंधनकारक आहे. ही निवड प्रक्रिया भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ६३ ते ७१ आणि उपराष्ट्रपती (निवड) नियम, १९७४ नुसार पार पाडली जाते.
या निवडणुकीसाठी ‘इलेक्टोरल कॉलेज’ म्हणजे लोकसभा व राज्यसभेतील सर्व सदस्य मतदान करतात. सध्या लोकसभेतील ५४३ आणि राज्यसभेतील २४५ अशा एकूण ७८८ खासदारांचा यात समावेश आहे. ही निवड गुप्त मतदानाच्या पद्धतीने व सिंगल ट्रान्सफरेबल व्होट (STV) प्रणालीद्वारे केली जाते.
निवडणुकीच्या तारखा लवकरच निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. सध्या केंद्रात भाजपप्रणीत एनडीएचे बहुमत असल्यामुळे, त्यांचाच उमेदवार उपराष्ट्रपतीपदावर निवडून येण्याची शक्यता जास्त आहे.
कोण होऊ शकतो नवा उपराष्ट्रपती?
भाजपने याआधी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल असलेले जगदीप धनखड यांची निवड केली होती. त्याआधी २०१७ मध्ये माजी भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांची नियुक्ती झाली होती. त्यामुळे यंदाही भाजप एखाद्या अनुभवी राजकीय नेत्याची किंवा माजी राज्यपालाची निवड करण्याची शक्यता आहे.
सध्या भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कारकाळ संपत असल्यामुळे पक्ष नवीन अध्यक्षांच्या शोधात आहे. त्यामुळे पक्षात वरिष्ठ पातळीवर अनेक मोठे निर्णय एकाच वेळी घेतले जात आहेत. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, पक्ष एक विश्वासार्ह, अनुभवसंपन्न आणि वादविवादांपासून दूर असलेल्या व्यक्तीची निवड करेल अशी शक्यता असल्याचं म्हटलं आहे. सध्याचे राज्यसभा उपाध्यक्ष हरिवंश सिंह यांचंही नाव चर्चेत आहे.
उपराष्ट्रपती होण्यासाठी कोणती पात्रता हवी?
उपराष्ट्रपती होण्यासाठी भारतीय नागरिक असणे, किमान वय ३५ वर्षे असणे आवश्यक आहे.शिवाय राज्यसभेवर निवडून येण्यास पात्र असणे आणि देशात कुठेही मतदार म्हणून नोंदणी असणे ही या पदासाठी मूलभूत अट आहे. याशिवाय, संबंधित व्यक्ती केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेत नसेल, (राष्ट्रपती, राज्यपाल किंवा मंत्री वगळता) ही अट देखील लागू आहे .
जगदीप धनखड यांचा कार्यकाळ संपण्यास अजून दोन वर्षे होती. ते २०२२ मध्ये उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले होते. परंतु त्यांच्या कारकिर्दीत अनेकदा राजकीय वाद निर्माण झाले, विशेषतः राज्यसभेत विरोधकांशी त्यांनी वेळोवेळी टोकाची भूमिका घेतली. काही वेळा त्यांच्या विधाने केंद्र सरकारलाही अडचणीत आणणारी ठरली. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव सादर करण्यात आला त्याच दिवशी त्यांनी राजीनामा दिला. हा प्रस्ताव खुद्द धनखड यांनी सभागृहात मांडला होता. दरम्यान धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदावर आता कोणाची वर्णी लागते? सत्ताधारी पक्ष काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.