या क्षणाला निवडणुका झाल्या तर बिहारवर कोणाची सत्ता? ओपिनियन पोलनी दिला कौल
बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीला अजून पाच महिने असले तरी सत्ताधाऱ्यांच्या आणि विरोधकांच्या हालचालींना वेग आला आहे. अशा पार्श्वभूमीवर ‘इंकसाइट’ या संस्थेने केलेल्या ताज्या ओपिनियन पोलमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक स्पष्ट झालं आहे. या सर्वेनुसार, जर आजच विधानसभा निवडणुका झाल्या, तर सत्तेवर पुन्हा एकदा एनडीएचीच सत्ता येण्याचे संकेत आहेत.
1 मे ते 15 जून 2025 या कालावधीत राज्यातील सर्व 243 विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये जवळपास सर्व स्तरांतील नागरिकांचा समावेश होता. या पोलचे सर्वात धक्कादायक आणि निर्णायक निष्कर्ष म्हणजे – महिला मतदारांचा एनडीएला मिळणारा प्रचंड पाठिंबा, जो या युतीच्या विजयाचा मुख्य आधार बनत असल्याचं दिसत आहे.
इंकसाइटच्या सर्वेनुसार, सध्या बिहारमध्ये एनडीएला 48.9 टक्के मतांचे समर्थन मिळत असून, त्याचवेळी महागठबंधनाला केवळ 35.8 टक्के मते मिळत आहेत. म्हणजेच एनडीएला सुमारे 13 टक्क्यांची स्पष्ट आघाडी लाभलेली आहे. ही आघाडी इतकी निर्णायक मानली जात आहे की, निवडणुका झाल्यास नीतीश कुमार पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता दाट आहे.
या यशामागे मुख्य हातभार लावणारी शक्ती म्हणजे – महिला मतदार. बिहारमध्ये महिलांनी पूर्वीही सत्ता बदलाच्या निर्णयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या वेळेसही त्यांनी स्पष्टपणे एनडीएच्या बाजूने कल दर्शवला आहे. सर्वेच्या आकडेवारीनुसार, 55 टक्के महिला मतदारांनी एनडीएला पाठिंबा दिला आहे, तर महागठबंधनाला केवळ 31 टक्के महिला समर्थन मिळालं आहे. म्हणजेच महिला मतांमध्ये तब्बल 24 टक्क्यांची मोठी दरी आहे.
या महिला समर्थनामागे नीतीश कुमार सरकारच्या महिलांसाठी राबवलेल्या योजनांचा मोठा वाटा आहे. मुलींच्या शिक्षणासाठीची प्रोत्साहन योजना, सायकल आणि स्कूटी योजनेद्वारे दिली जाणारी मदत, शिष्यवृत्त्या, तसेच सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण अशा अनेक उपक्रमांमुळे महिला वर्ग नीतीश सरकारकडे झुकला आहे.
दुसरीकडे, पुरुष मतदारांचे मन मात्र अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. सर्वे नुसार, 44 टक्के पुरुष एनडीएच्या बाजूने आहेत, तर 40 टक्के महागठबंधनाच्या बाजूने, म्हणजे केवळ 4 टक्क्यांची तुटपुंज्या फरकाने पुरुष मतदार विभागलेले आहेत. ही परिस्थिती पाहता महिला मतदारांनी एकतर्फी मतदान केल्यामुळेच एनडीएला एकूण एक प्रबळ स्थिती मिळाली आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा बदल म्हणजे गठबंधनातील फेरबदल. या वेळेस विकासशील इंसान पार्टी (VIP) महागठबंधनात सामील झाली असून, दुसरीकडे उपेंद्र कुशवाहा पुन्हा एनडीएसोबत आले आहेत. याशिवाय चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचाही एनडीएत प्रवेश झाल्यामुळे, युतीला आणखी 5-6 टक्क्यांचे अतिरिक्त मते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जातीय समीकरणं, सीट वाटप आणि स्थानिक समीकरणांच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्वांवर मात करत महिला मतदारांनी एनडीएच्या पारड्यात आपला विश्वास टाकल्याचे या ओपिनियन पोलमधून स्पष्ट होत आहे.
अर्थात, ही केवळ एक सर्वेक्षणावर आधारित अंदाज आहे. अंतिम निर्णय मतपेटीतूनच निघेल. मात्र, जर हेच वातावरण पुढील काही महिन्यांत कायम राहिले, तर बिहारमध्ये एनडीएला पुन्हा एकदा सत्ता मिळणं जवळपास निश्चित मानलं जाऊ शकतं.