महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुघल सम्राट औरंगजेबावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. औरंगजेबाच्या कारकिर्दिवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. हे सर्व सुरूअसतानाच प्रसिद्ध इतिहासकार इरफान हबीब यांनी मुघल सम्राट औरंगजेबाच्या कारकिर्दीबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यांच्या मते, औरंगजेबाने जवळपास पन्नास वर्षे (१६५८ ते १७०७) भारतावर शासन केले. मंदिरांबाबत त्याने घेतलेली भूमिका यापूर्वी कोणत्याही मुघल सम्राटाने स्वीकारली नव्हती.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतल त्यांनी यावर भाष्य केलं आहे. इरफान हबीब यांच्या म्हणण्यानुसार, १६६८ च्या सुमारास औरंगजेबाने काही मंदिरे पाडण्यास सुरुवात केली. जरी त्याच्या कारकिर्दीत अनेक मंदिरे सुरक्षित राहिली, तरीही काही मंदिरे त्याने उद्ध्वस्त केली असल्याच्या ऐतिहासिक नोंदी आढळतात. विशेषतः मथुरा, वृंदावन आणि काशी-बनारस येथील मंदिरे यामध्ये समाविष्ट होती. या घटनांचे दस्तऐवजीकरणही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.त्यावेळच्या अधिकाऱ्यांच्या नोंदींनुसार, मंदिरांचे विध्वंस केल्याने त्याला धार्मिक पुण्य लाभेल आणि ईश्वर प्रसन्न होईल,असा त्याचा विश्वास होता. मात्र, त्याने नक्की किती मंदिरे पाडली, याचा नेमका अंदाज लावणे कठीण आहे.
त्या काळात भारतात विविध धर्मांचे लोक आपापल्या धार्मिक परंपरांनुसार पूजा करत होते. याउलट, युरोपमध्ये मात्र अन्य धर्मीयांना कोणतेही स्वातंत्र्य दिले जात नव्हते. औरंगजेबाच्या दरबारात हिंदू राजपूत अधिकारीही कार्यरत होते, त्यामुळे त्याच्या राजवटीत काही प्रमाणात धार्मिक सहिष्णुता होती, असेही काही इतिहासकार मानतात.
औरंगजेब मुघल साम्राज्याचा सहावा आणि शेवटचा प्रभावशाली सम्राट मानला जातो. त्याने कठोर इस्लामिक धोरणे अवलंबली आणि आपल्या प्रशासनात कडक नियम लागू केले. वडील शाहजहान यांना सत्तेवरून दूर करून त्याने गादी मिळवली.त्याच्या राजवटीत मुघल साम्राज्य विस्तारले, परंतु धार्मिक धोरणांमुळे त्याला अनेक बंडखोरींना तोंड द्यावे लागले. जझिया कर पुन्हा लागू करून आणि काही मंदिरे पाडून त्याने हिंदू प्रजेमध्ये नाराजी निर्माण केली. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला. त्याच्या कठोर प्रशासनामुळे तो आजही वादग्रस्त शासक मानला जातो.
Beed Crime: सतीश भोसले प्रकरणात सुरेश धसांनाही सहआरोपी कऱण्याची मागणी; नेमकं काय आहे कारण?