Photo Credit-Team Navrashtra
बीड : बीड जिल्ह्यातील शिरूरकासार येथे सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याच्यावर गुन्हा दाखल असूनही तो अद्याप फरार आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ आणि त्याला तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी आज शिरूर शहर बंद ठेवण्यात आले आहे. तसेच, स्थानिक पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये शेकडो नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या मोर्चात ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सकाळी ९ वाजता निघालेल्या या मोर्चात सहभागी झालेल्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांना सहआरोपी करण्याची मागणी केली. तसेच, आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा सहा प्रमुख मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील शिरूरकासार येथे सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या अटकेसाठी निघालेल्या आक्रोश मोर्चात ढाकणे कुटुंबीयही सहभागी झाले होते. या वेळी महेश ढाकणे यांनी आपल्या भावना व्यक्त करत, सतीश भोसलेविरोधात एसआयटी (विशेष तपास पथक) चौकशीची मागणी केली.
Jagdeep Dhankhar Health News: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली; एम्समध्ये उपचार सुरू
“आम्हाला राहण्याची भीती वाटते, रात्रभर झोप लागत नाही. माझ्या वडिलांचे दात पडले, माझा पाय फ्रॅक्चर झाला आहे. सतीश भोसलेने किमान 200 हरणांची शिकार केली आहे, त्यामुळे त्याची सखोल चौकशी व्हावी आणि त्याला लवकरात लवकर अटक करावी,” असे महेश ढाकणे म्हणाले.तसेच, “सतीश भोसलेने आम्हाला मरणाच्या उंबरठ्यावर आणले. आमच्यावर हल्ला करणाऱ्या सर्वांना लवकर अटक झाली पाहिजे. त्याने खड्डे करून काहीतरी पुरले आहे, त्याची तपासणी करावी. हरणांची शिकार करून तो स्कॉर्पिओ गाडीतून नेतोय, हे मी स्वतः पाहिले आहे,” असे गंभीर आरोप त्यांनी केले. या मागण्यांसह, मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.
शिरूरकासार येथे सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या अटकेसाठी निघालेल्या आक्रोश मोर्चात दिलीप ढाकणे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.”मोर्चात सहभागी झालेल्या सर्वांचा मी आभारी आहे. आम्हाला एवढं मारलं याचं आम्हाला कमी दुःख आहे, पण मला सर्वात जास्त दुःख हरणांसारख्या वन्य प्राण्यांच्या निर्दयी हत्येचं आहे. मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून माझ्यावर इतका हल्ला झाला. जर मानवावर असा हल्ला केला जात असेल, तर मुक्या प्राण्यांवर किती क्रूरता केली जात असेल, याचा विचार करा,” असे त्यांनी सांगितले. “आमची एकच मागणी आहे—या सर्व आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे.”मोर्चेकऱ्यांनीही आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करत प्रशासनावर दबाव वाढवला आहे.