
Death
शहाजहानपूर : धावत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करणारी महिला कॉन्स्टेबल प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये पडली. यादरम्यान झालेल्या अपघातात या महिलेचा जागीच मृत्यू (Woman Died in Train Journey) झाला. ही घटना शहाजहानपूर येथील रोजा रेल्वे स्थानकावर रात्री घडली.
किरण कटियार असे या महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे. किरण या मूळच्या कानपूरच्या बिल्हौर तहसीलमधील बकोठी गावची रहिवासी होत्या. त्या २३ जानेवारी २०२४ पासून चौक कोतवाली येथे तैनात होत्या. त्या मुरादाबादला व्हिसेराचा नमुना घेऊन चाचणीसाठी गेल्या होत्या. पेपरअभावी व्हिसेरा तपासता आला नाही. परतीच्या प्रवासात ती मुरादाबादहून अमृतसर-बनमंखी एक्स्प्रेसमध्ये चढल्या. या ट्रेनला शाहजहानपूर येथे थांबा नाही.
रोजा स्थानकावर रात्री साडेआठच्या सुमारास गाडीचा वेग कमी झाल्यावर त्यांनी खाली उतरण्याचा प्रयत्न केला. पण यादरम्यान किरण खाली पडल्या आणि ट्रेन आणि प्लॅटफॉर्म- २ च्या मध्ये आल्या. त्यानंतर त्यांना गंभीर जखमा झाल्या. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.