पंढरपूर : कर्जबाजारीपणाला कंटाळून व ऊसाचे बिल वेळेवर मिळत नसल्याने पंढरपुरातील एका तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी गावात घडली आहे.
सूरज जाधव (वय 23) असं आत्महत्या केलेल्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी विरोधी धोरणाचा या तरुण शेतकऱ्याचा बळी असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केला आहे. सुरज जाधव हा अल्पभूधारक शेतकरी आहे. शेतीला जोड धंदा म्हणून दूध व्यवसाय ही तो करत होता.
दरम्यान, साखर कारखान्याला गेलेल्या ऊसाचे पैसेही मिळाले नसल्याने त्याच्याकडे सुमारे 23 लाखांचे कर्ज झाले होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. यातूनच सूरज याने २ मार्च रोजी शेतात विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्याला पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान सूरज जाधव यांचा आज मृत्यू झाला.
आत्महत्या करण्यापूर्वी सुरज जाधवने एक व्हिडीओ बनवला आहे. यात तो म्हणतोय, ‘शेतकऱ्याच्या जन्माला आपण परत कधीच येणार नाही. आपलं आयुष्य इथपर्यंतच होतं. इथून पुढे आयुष्य नाही. शेतकरी नामर्द आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या जन्माला आपण येणार नाही. सरकार कधी शेतकऱ्याच्या नादाला लागत नाही. सरकार शेतकऱ्याचा कधी विचार करत नाही’, अस म्हणत त्याने विषारी औषध प्राशन केले. शेतकरी सुरज जाधव यांच्या आत्महत्येने सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
…ही आत्महत्या नाही तर सरकारने पाडलेला खून : रविकांत तुपकर
या घटनेची माहिती समजताच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सूरज जाधव नावाच्या शेतकरी पुत्राने स्वतःची व्हिडिओ चित्रफीत तयार करून आज महावितरणला कंटाळून आणि सरकारला कंटाळून आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नाही तर सरकारने पाडलेला खून आहे.
आत्महत्या महाराष्ट्राला चिंतन करायला लावणारी बाब
लॉकडाऊन काळात भरमसाट आश्वासने देऊन ठेवली तर अव्वाच्या सव्वा बिल तुम्ही शेतकऱ्याला देताय. पठाणी वसुलीसारखं काही इंग्रजांच्या काळात अशा पद्धतीने शेतकऱ्यांकडून वसुली करतात. बिल भरल्यानंतर सुद्धा एखादे कनेक्शन कट करतात. त्या लोकांना विजेपासून वंचित ठेवतात. सगळ्या महाराष्ट्राला आत्महत्या एक चिंतन करायला लावणारी बाब आहे.
रक्ताचा नैवेद्य लागतो का?
किती शेतकऱ्यांचा बळी तुम्ही घेणार आहे, या सरकारला शेतकऱ्यांच्या रक्ताचा नैवेद्य लागतो का? सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? मी शेतकऱ्यांच्या पुत्रांना सांगतो की, आत्महत्या करायची नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्याबरोबर खंबीरपणे उभी आहे. तुमच्यावर आलेली गोळी पहिली आमच्या छाती वर घेऊ पण आत्महत्या करू नका.