मुंबई – आज (८ नोव्हेंबर) संध्याकाळी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. संपूर्ण चंद्रग्रहण (Lunar Eclipse) देशाच्या पूर्व भागात आणि उर्वरित शहरांमध्ये खंडग्रास चंद्रग्रहण (Continental Lunar Eclipse) दिसेल. पुढील वर्षी २०२३ मध्ये एकूण चार ग्रहण होतील. दोन सूर्यग्रहण (Solar Eclipse) आणि दोन चंद्रग्रहण होतील, परंतु देशात फक्त एकच खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. चंद्रग्रहण इटानगरमध्ये संध्याकाळी ४.२३, दिल्लीत ५.२८ आणि मुंबईत (Mumbai) ६.०१ वाजता सुरू होणार असून संध्याकाळी ६.१९ पर्यंत राहणार आहे.
उज्जैन च्या जिवाजी वेधशाळेचे (Jiwaji Observatory) अधीक्षक डॉ. राजेंद्र गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात चंद्रग्रहण दुपारी २.३८ वाजता सुरू होईल. देशाच्या पूर्वेकडील भागात कोलकाता, कोहिमा, पाटणा, पुरी, रांची आणि इटानगरच्या जवळपासच्या शहरांमध्ये संपूर्ण चंद्रग्रहण दिसेल. उर्वरित भारतामध्ये आंशिक (खंडग्रास) चंद्रग्रहण दिसणार आहे. जेथे पूर्ण ग्रहण असेल तेथे चंद्र लाल दिसेल. सर्वप्रथम, अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे संध्याकाळी ४.२३ पासून संपूर्ण चंद्रग्रहण दिसेल. संध्याकाळी ६.१९ वाजता ग्रहण संपेल.
पॅसिफिक प्रदेशात भारतीय वेळेनुसार दुपारी १.३१ वाजता उपछाया चंद्रग्रहण सुरू होईल, त्यानंतर २.३८ वाजता खंडग्रास ग्रहण होईल. संपूर्ण चंद्रग्रहण ३.४६ ते सायंकाळी ५.११ या वेळेत दिसणार आहे. ६.१९ ला खंडग्रास ग्रहण संपणार असून सायंकाळी ७.२६ पर्यंत छाया चंद्रग्रहण संपेल. पॅसिफिकमध्ये ५ तास ५४ मिनिटे आणि अमेरिकेत ३ तास ३९ मिनिटांचे चंद्रग्रहण असणार आहे.
पुढील चंद्रग्रहण २८ ऑक्टोबर २०२३ रोजी
पुढील वर्षी २० एप्रिल रोजी सूर्यग्रहण होणार आहे. ५ मे २०२३ रोजी उपछाया चंद्रग्रहण होईल, याची धार्मिक मान्यता नाही. १४ ऑक्टोबरला सूर्यग्रहण होणार आहे. ही तीन ग्रहणे भारतात दिसणार नाहीत. २८ ऑक्टोबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण होणार असून ते देशात दिसणार आहे.