संग्रहित फोटो
प्रफुल सुनील काळे (वय २१, रा. माळेगाव कल्याणी, ता. निलंगा) हे मोटारसायकल क्रमांक एमएच २४ सीएच ४०४२ वरून औरादकडून निलंग्याकडे जात होते. दरम्यान, मोघे म्हसोबावाडी पाटीजवळ रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास पुढे जाणाऱ्या एमएच १२ जीएस १९३० क्रमांकाच्या मोटारसायकलच्या चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे प्रफुल काळे यांच्या मोटारसायकलची पुढील वाहनाला धडक झाली. धडकेनंतर प्रफुल काळे मोटारसायकलवरून उडून सिमेंटच्या रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय, निलंगा येथे नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
हेल्मेट होते; पण डोक्यावर नव्हते!
या अपघातातील महत्त्वाची बाब म्हणजे प्रफुल काळे यांच्याकडे हेल्मेट होते. मात्र त्यांनी ते डोक्यावर परिधान केले नव्हते. हेल्मेट मोटारसायकलच्या हँडलला अडकवून ते प्रवास करत होते. अपघाताच्या वेळी डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हेल्मेट मोटारसायकलला अडकवून नेणे, हातात घेणे किंवा केवळ सोबत ठेवणे यामुळे डोक्याचे संरक्षण होत नाही. अपघाताच्या क्षणी हेल्मेट डोक्यावर योग्य पद्धतीने परिधान केलेले असणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘हेल्मेट आहे’ यापेक्षा ‘हेल्मेट डोक्यावर आहे’ हे अधिक महत्त्वाचे आहे. काही सेकंदांचा निष्काळजीपणा ठरू शकतो जीवघेणा याचे उदाहरण पहायला मिळाले.






