हैदराबाद : गेल्या तीन दिवसापासून अग्नीपथ योजनेवरून सुरू झालेलं आंदोलनाला आता वेगळ वळण लागलयं. अनेक राज्यात आंदोलन सुरू असून आज बिहारमध्ये रेल्वेच्या १० बोगी पेटवण्यात आल्या तर तेंलगणातही ट्रेन पेटवण्यात आली. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.
केंद्र सरकारने सशस्त्र दलात भरतीसाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये तिसऱ्या दिवशीही निदर्शने सुरू आहेत. अनेक राज्यात गाड्या जाळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले. बिहारमध्ये 19 जिल्ह्यांमध्ये निदर्शने झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. येथे अनेक ठिकाणी निदर्शनांना हिंसक वळण लागले आहे. लखीसरायमध्ये ट्रेनच्या 10 बोगींना आग लावण्यात आली. हाजीपूर स्थानकाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. बेतिया येथेही तोडफोड झाली. बक्सरमध्ये विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅकवर निदर्शने केली. येथे डुमराव रेल्वे स्थानकाच्या अप आणि डाऊन मार्गावर जाम झाला होता.
[read_also content=”मुलं लग्नासाठी टाळाटाळ करत आहेत? ‘अशी’ असू शकतात कारणं, वाचा माहिती https://www.navarashtra.com/lifestyle/if-your-son-or-daughter-are-not-ready-to-get-married-read-reasons-behind-it-nrak-293557.html”]
दिल्ली-कोलकाता रेल्वे मुख्य रस्ता ठप्प झाल्याने अनेक गाड्या तासन्तास अडकून पडल्या होत्या. सैन्य भरतीच्या नव्या नियमाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी पहाटे पाच वाजल्यापासून रेल्वे रुळावर बसून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. शुक्रवारी सकाळी समस्तीपूरमध्ये आंदोलकांनी जम्मू तवी-गुवाहाटी एक्सप्रेस ट्रेन पेटवून दिली. ट्रेनच्या दोन बोगी जळून राख झाली. आराच्या बिहिया स्टेशनवर जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे. तर, अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ तरुणांनी बलिया रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनची तोडफोड करून ती पेटवून दिली. आंदोलकांनी शहरातील अनेक दुकानांचे काउंटरही फोडले. गोंधळ घालणाऱ्या लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. फिरोजाबादमधील मतसेना भागात काही तरुणांनी आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर गोंधळ घातला. यूपी रोडवेजच्या अनेक बसेसवर दगडफेक करून नुकसान केले.