सांगली : वाईनप्रमाणेच गुळापासून बनवलेल्या हातभट्टीची वाईन व मोहाच्या फुलांची वाईन विकण्यासाठी मॉल व किराणामाल दुकानांमध्ये परवानगी द्या, अशी उपहासात्मक मागणी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सदाभाऊ खोत यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकानामध्ये आणि मॉलमध्ये वाईन विक्रीचा जो निर्णय घेतला आहे. त्याचं महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आनंदाने स्वागत करत आहे. आपल्या या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादकांना सोन्याचे दिवस येणार आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी आपल्या घरावर या निर्णयामुळे गुढी उभारुन स्वागत केले आहे.
या पत्राद्वारे आपणास एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आणून देत आहे, की आपण वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
गूळ व्यवसाय हा सध्या मोठ्या अडचणीतून जात आहे. अनेक गुऱ्हाळघरे बंद पडलेली आहेत. ही गुऱ्हाळघर जर नव्याने पूर्वीसारखी चालवायची असतील तर गुळापासून गावठी हातभट्टी वाईन बनवायला परवानगी देण्यात यावी. सदर वाईन ही कमी खर्चात तयार करता येईल. गुळाची वाईन तयार करायचे कारखाने गावागावांमध्ये उभा करता येतील. यातून रोजगार तर वाढेलच पण ऊस उत्पादकांना सोन्याचे दिवस येतील.
तसेच आदिवासी शेतकऱ्यांनाही आपणांस न्याय द्यावा लागेल. मोहाच्या फुलांची वाईन बनवून त्याच्या विक्रीला परवानगी द्यावी, कारण सध्या आपण शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहात. म्हणूनच छोट्या-मोठ्या मद्यनिर्मिती करणाऱ्या ग्रामीण भागातील पारंपारिक मद्य निर्मात्यांना आर्थिक बळकटी मिळावा, यासाठी द्राक्षाच्या उत्पादकांप्रमाणेच राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनादेखील आपण दिलासा द्यावा, अशी मी आपल्या महाविकास आघाडीकडुन अपेक्षा व्यक्त करतो, असेही आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.