फोटो सौजन्य -x
भगवान लोके,कणकवली : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ४ दिवसांपूर्वी कोसळला. या प्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होता.गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या पाटील यांना ३० ऑगस्ट मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून त्याला अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक कोल्हापुरातून चेतन पाटील ला आणण्यासाठी गेले असून त्या जिल्ह्यात आणण्यात येणार आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक कोसळला. यानंतर अनेक शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या तर सरकार विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे.
लोकेशन कोल्हापूर पोलिसांची धाड, जयदीप आपटे अद्याप फरार
याप्रकरणी ठाण्याचा शिल्पकार जयदीप आपटे आणि चबुतराचे काम केलेले आणि सल्लागारपदी काम करणारे कोल्हापूरचे चेतन पाटील या दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यानंतर दोन दिवसांपूर्वी मालवण पोलिसांनी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठेत राहणारा चेतन पाटील याचा घरी ताब्यात घेण्यासाठी पोचले असता चेतन पाटील फरार होता. तर दुसरीकडे शिल्पकार जयदीप आपटे देखील फरार आहे. दोन दिवसांपासून चेतन पाटील याचे लोकेशन पुणे येथे दाखवत होते. मात्र, काल रात्री तीनच्या सुमारास चेतन पाटील याचे लोकेशन कोल्हापूर दाखवल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्वरित हालचाली करत चेतन पाटील याला ताब्यात घेतले. मालवण पोलिसांच्या हाती पुढील कारवाईसाठी सुपूर्द केले आहे. एकीकडे चेतन पाटील पोलिसांच्या हाती लागला असला तरी या प्रकरणातील ठाण्याचा शिल्पकार जयदीप आपटे अद्याप फरार आहे,त्याच्या मागावर सिंधुदुर्ग पोलीस आहेत.
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी मागितली महाराजांची माफी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्यांचा ड्रीम प्रोजक्ट मानल्या जाणाऱ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी राजकोट किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाबद्दल भरसभेमध्ये माफी मागितली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे. मोदी म्हणाले की, “सिंधूदुर्गामध्ये जे झालं ते वाईट झालं. माझ्यासाठी आणि माझ्या साथीदारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही. शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. सिंधूदुर्गातील प्रकरणामुळे मी आज नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची चरणावर डोके ठेवून माफी मागतो. जे जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानतात, त्या प्रत्येकाच्या मनाला ज्या वेदना झाल्या आहेत. त्या सर्व शिवप्रेमींची देखील नतमस्तक होऊन माफी मागतो. आमच्यासाठी आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठं काहीच नाही,” अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.