मुंबई : करीरोड, लालबाग परिसरातल्या अविघ्ना या आलिशान इमारतीला आज दुपारी १२ च्या सुमारास आग लागली. या आगीमधून बाहेर पडण्यासाठी, आपला जीव वाचवण्यासाठी एका व्यक्तीने १९ व्या मजल्यावरुन उडी मारली, त्यात त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी १६ अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न केले. आता आलेल्या ताज्या माहितीनुसार आगीवर नियत्रंण मिळवण्यात यश आले आहे. घटनास्थळी महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इकबाल चहल हे देखील दाखल झाले. परिस्थितीची पाहणी केल्यानंतर चहल यांनी ही आग नियंत्रणात आल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी एक चिंताही व्यक्त केली. तसेच जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई सुद्धा करणार असल्यांच आयुक्त म्हणाले.
दरम्यान या आगीत जीव वाचविण्यासाठी एका सुरक्षारक्षकाने १९ व्या मजल्यावरुन उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला. “आग लागली तेव्हा आम्ही घरात होतो. पण धुराचे लोट पसरल्याने काही तरी जळाल्यासारखा वास आला. ही दुर्गंधी अधिकच वाढल्याने आम्ही खिडकी आणि दरवाजा उघडून पाहिल्यानंतर आमच्याच सोसायटीला आग लागल्याचे दिसले. धुराच्या लोटाने परिसर काळवंडून गेला होता. हे दृश्य पाहून काळजात धस्स झालं अन् आम्ही आहे त्या अवस्थेत घरातून तात्काळ बाहेर धाव घेतली, असं या इमारतीत राहणाऱ्या नागरिकाने सांगितली”
घटनास्थळी महपौर आणि आयुक्त, दोषींवर कारवाई
आग लागल्याचे समजताच महापौर किशोरी पेडणेकर आणि आयुक्त इक्बालसिंग चहल दाखल झाले होते. घटनास्थळावरुन माध्यमांशी संवाद साधताना चहल म्हणाले, “इथे जी दुर्दैवी घटना घडली आहे तिला दोन भागात बघितलं पाहिजे. सर्वात आधी म्हणजे ही आग लवकरात लवकर विझवायला हवी. आम्हाला ११ वाजून ५१ मिनिटांनी माहिती मिळाली आणि लगेचच तिथे लोक पोहोचले. ही आग आता विझवली गेली आहे. आमचे अधिकारी त्या इमारतीतच आहेत. आणखी काही घटना घडू नये यासाठी ही आग कायमची विझवली गेली पाहिजे. कारण अजूनही धूर येत आहे. आग विझली नाही तर ही आग पुन्हा लागण्याची शक्यता आहे. कारण तशा काही गोष्टी इमारतीमध्ये आहेत. इथे एका व्यक्तीचा मृत्यूही झाल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. या सगळ्या दुर्घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल” असं आयुक्तांनी म्हटले आहे.
१९व्या मजल्यावर आग लागली. पण पाचव्या मजल्यावर आधी आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. आग नियंत्रणात आली आहे. पण पूर्ण विझली नाहीय, धुराचे लोट अजूनही आहेत, त्यामुळं नागरिकांनी चिंता व्यक्त केलीय.
कशा घडल्या घडामोडी
– दुपारी १२ वाजल्याच्या सुमारास वन अविघ्न या इमारतीला भीषण आग
– पाचव्या माळ्यावर लागलेली आग काही वेळातच १९व्या मजल्यापर्यंत
– ९ व्या माळ्यावर फर्निचरचे काम सुरु असताना शॉकसर्किटमुळं लागली आग
– सुरक्षारक्षकाने पळण्याचा प्रयत्न केला मात्र तो बाल्कनीमध्ये गेला. जीव वाचवण्यासाठी खाली उडी मारली, खाली पडल्यानंतर जागीच त्याचा मृत्यू झाला.
-केईएम रुग्णालयामध्ये या ३० वर्षीय सुरक्षारक्षकाला दाखल करण्यात आलं असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
-तासाभरानंतर अग्निशामन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
-अरुंद रस्ते, उंच इमारत अशा अनेक अडचणीनंतर अखेर अग्निशामक दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
-सध्या आग नियत्रंणात पण धुराचे लोट सुरुच, त्यामुळं भीतीचे वातावरण