सातारा : महावितरण कंपनीद्वारा विद्युत सहाय्यकपदी नेमणूक झालेल्या इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी आज सकाळी येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चिकित्सा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अक्षरशः नंगानाच केला. ८० पेक्षा अधिक उमेदवारांनी एकत्र येऊन जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनावर दबाव टाकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत दबाव आणला.
वैद्यकीय चिकित्सा प्रमाणपत्र मिळण्याबाबत जिल्हा रुग्णालयाशी कोणताही पत्रव्यवहार न करता संबंधित उमेदवारांनी जिल्हा रुग्णालयात व्हिडिओ शुटिंग, मोबाईलवर फोटो काढून आपली मर्दुमकी गाजवली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयात एका महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेत पोलिसांना पाचारण केले. तोपर्यंत पळपुट्या उमेदवारांनी तेथून काढता पाय घेतला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने विद्युत सहाय्यक योजनेअंतर्गत भरतीद्वारे काही उमेदवारांची विद्युत सहाय्यकपदी नेमणुकीसाठी निवड केली होती. यामध्ये विशेष करून उस्मानाबाद, परभणी, जळगाव आदी जिल्ह्यातील उमेदवारांची संख्या ८० पेक्षा अधिक आहे. त्यांना नियुक्ती आदेश देण्यापूर्वी त्यांच्या कंपनीतील सेवेसाठी त्यांच्या सेवेसाठी शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याबाबतचे वैद्यकीय चिकित्सा प्रमाणपत्र देणे त्यांना अनिर्वाय करण्यात आले होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी विविध जिल्ह्यातून पात्र उमेदवार आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अचानक झुंडीने जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. मुळात याबाबतची कोणतीही पूर्वकल्पना जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण अथवा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली नव्हती.
जिल्हा रुग्णालयात नियमित कामकाज सुरू असताना या झुंडीने जिल्हा रुग्णालयात प्रवेश करत वैद्यकीय चिकित्सा प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावेत, अशी मागणी केली. मुळात जिल्हा रुग्णालयात प्रतिदिन आठ ते दहा एवढ्या जणांची वैद्यकीय चिकित्सा केली जाते. जिल्हा रुग्णालयाची व्याप्ती आणि अपुरे मनुष्यबळ पाहता यापेक्षा अधिक जणांची वैद्यकीय चिकित्सा केली जात नाही. ही वस्तुस्थिती असताना संबंधित उमेदवारांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घालत ‘भारत माता की जय’, अशी घोषणाबाजी करत आम्हाला वैद्यकीय चिकित्सा प्रमाणपत्र दिलेच पाहिजे, असा दबाव आणत जिल्हा रुग्णालयात एकच गदारोळ केला.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत तैनात असणारे पोलीस नाईक कृष्णदेव शेडगे, सुरक्षारक्षक राजू कांबळे, शिवाजी इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलिस आणि सुरक्षा रक्षक आल्याचे पाहताच आणि वैद्यकीय चिकित्सा प्रमाणपत्र हाती मिळताच संबंधित उमेदवारांनी अक्षरशः हुल्लडबाजी करत जिल्हा रुग्णालयातून पलायन केले.
याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीतून ते थेट जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी प्रथम घडलेल्या घटनेची माहिती घेऊन महावितरण कंपनीच्या अधिकार्यांतशी संपर्क साधत जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेची माहिती देत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. जिल्हा रुग्णालय प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय चिकित्सा प्रमाणपत्रासाठी तुम्ही पाठवताच कसे, असा जाब विचारत यापुढे असला फाजीलपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड इशारा दिला.






