डेव्हिड धवनने संकलक म्हणून कारकिर्द करताना महेश भट्ट दिग्दर्शित ‘सारांश’ (१९८४)च्या संकलनात विशेष लक्षवेधक कामगिरी केली. आणखीन काही चित्रपटांसाठी संकलक टेबलावर आपण अडकून न पडता चित्रपट दिग्दर्शनातही पाऊल टाकावे असा सकारात्मक विचार करत त्याने ‘ताकदवर’ (१९८९), ‘जुर्रत’ (१९८९) अशा चित्रपटातून तशी सुरुवातही केली. याच काळात गोविंदा ‘एकाच वेळेस ६०\६२ चित्रपटात काम’ असा विक्रम करत असतानाच डेव्हिड धवनला गोविंदाच्या रुपाने जणू सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये गर्दी जमवणारा मनोरंजनाचा हुकमी हिरा सापडला आणि त्यातून त्या दोघांची विनोदी चित्रपटांची भट्टी जमली. जोडीला नायिका म्हणून लोलो करिश्मा कपूर, मसालेदार भर घालण्यात कादर खान, शक्ती कपूर, सतिश कौशिक, असरानी. भेळ चांगलीच जमे. डेव्हिड धवन व गोविंदा जोडीने तब्बल पंधरा चित्रपटातून रसिकांचे मसाला मिक्स मनोरंजन केले. त्यात काही चित्रपट रिमेक होते. ते करताना मूळ चित्रपटात आपल्या अतिरंजित, अतिशोयोक्तीपूर्ण मनोरंजनाची भर घातली. दोन उदाहरणे अशी, एस. रामनाथन दिग्दर्शित ‘दो फूल’ (१९७३)वरुन ‘आंखे’ (१९९३) आणि ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘बावर्ची’ (१९७२) वरुन ‘हीरो नंबर वन ‘ ( १९९७). मेहमूदसारखी भन्नाट नि सहज काॅमेडी न करताही गोविंदा ‘आंखे’च्या डबल रोलमध्ये पसंत पडला. आणि राजेश खन्नासारखे संवादाचे टायमिंग न साधताही तो ‘हीरो नंबर वन ‘ म्हणून पसंत पडला. डेव्हिड धवन व गोविंदाची केमिस्ट्री म्हणजे हुकमी मनोरंजक हे समीकरण हिट्ट असल्यानेच त्यांच्या चित्रपटांचा हुकमी प्रेक्षकवर्ग वाढत राहिला. व्यावसायिक पातळीवर हे फारच महत्वाचे असते. अन्यथा फक्त चित्रपटांची संख्या वाढत राहते. डेव्हिड धवनला ‘स्टाॅलच्या पब्लिक’ची नस सापडली होती. म्हणूनच त्याला दिग्दर्शक मनमोहन देसाई यांची परंपरा पुढे घेऊन जाणारा दिग्दर्शक म्हणत आणि विशेष उल्लेखनीय गोष्ट, मनजींनी त्याचे गुण हेरुन त्याला आपल्या एमकेडी फिल्म बॅनरखालील चित्रपटासाठी करारबद्ध केले. चित्रपटाचे नाव होते, ‘डम डम डिगा डिगा ‘ ( मनजींचा पहिला चित्रपट ‘छलिया’मधील गाण्याचा हा लोकप्रिय मुखडा). हा चित्रपट घोषणेपुरताच राहिला. त्यातच मनजींचे निधनही झाले. पण डेव्हिड धवनने त्यांच्या बॅनरसाठी ‘दीवाना मस्ताना ‘ बनवला. त्याच्या निर्मितीवस्थेत बराच काळ गेला. आणि मग डेव्हिड धवनचा हा आणि आणि मिस्टर अॅण्ड मिसेस खिलाडी हे दोन चित्रपट १० ऑक्टोबर १९९७ या एकाच शुक्रवारी मुंबईत रिलीज झाले. एकाच दिग्दर्शकाचे एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित हा एक प्रकारचा आश्चर्यकारक विक्रमच. आणि कायमच वेळेवर सेटवर न येण्याबद्दल ख्याती असलेल्या गोविंदाला हीरो करीत तब्बल पंधरा चित्रपटांचे दिग्दर्शन करणे हादेखील डेव्हिड धवनचा एक वेगळा विक्रमच. आपल्या स्टारची एकूणच कामाची पद्धत व्यवस्थित जाणून घेत व हाताळत वाटचाल करणे हेदेखील दिग्दर्शन कौशल्य व कसब. डेव्हिड धवन मुळात संकलक असल्याचा अशा परिस्थितीत भरपूर फायदाच झाला. गोविंदा सेटवर येईपर्यंत आणि मग असेपर्यंत कोणती दृश्य चित्रीत करता येतील हे दिग्दर्शकातील संकलकच उत्तम प्रकारे जाणे. अशातच गोविंदाच्या किमान चार चित्रपटांच्या गाण्याचे कुलू मनाली, उटी अथवा युरोपात चित्रीकरण सत्र आयोजित केले जाई. चित्रपट निर्मितीत असे व्यावसायिक हुशारी अथवा ॲजेस्टमेंटचे अनेक फंडे खेळवावे वा वापरावे लागतातच. येथेही दिग्दर्शक दिसतो असेही विशेष कौतुकाने म्हणता येईल.
डेव्हिड धवनने दिग्दर्शनाचा जबरदस्त धडाकाच लावला होता. शोला और शबनम, आग का गोला, इना मिना डिका, राजा बाबू, याराना, साजन चले ससुराल, क्यों कि मै झूठ नहीं बोलता (या चित्रपटाचे नाव अगोदर ‘सजन रे झूठ मत बोलो’ असे होते.), चल मेरे भाई, मैने प्यार क्यू किया, पार्टनर हेही डेव्हिड धवन दिग्दर्शित धमाल चित्रपट. एकूण तब्बल बेचाळीस चित्रपटांचे दिग्दर्शन. त्यात दोन तीन सामाजिकही. एक प्रकारची चित्रपट दिग्दर्शनाची फॅक्टरीच. काय जबरदस्त क्षमता लागली असेल ना? यात आणखीन एक विशेष, अमिताभ बच्चनला आपल्या ‘उंची’ कारकिर्दीत दोन तीनदा ‘पडता काळ’ अनुभवावा लागला. अशातच त्याने डेव्हिड धवन व गोविंदा या सुपर हिट जोडीसोबतचा ‘बडे मियां छोटे मियां’ स्वीकारला. मला आठवतय जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील स्वीमिंग पूलावर या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळी बीग बी आपल्या दिग्दर्शनात भूमिका साकारतोय याचा डेव्हिड धवनला होत असलेला विलक्षण आनंद त्याच्या बोलण्यात, खरं तर एकूणच देहबोलीतून जाणवत होता. डेव्हिड धवन मीडिया फ्रेन्डली आणि त्या काळात त्याच्या चित्रपटांच्या सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी आम्हा सिनेपत्रकारांचे कायमच स्वागत होत असे. आपण ‘सर्वसामान्य प्रेक्षकांचे दिग्दर्शक असून आपले चित्रपट त्यांच्यापर्यंत मिडिया पोहचवू शकतो’ याचे त्याला उत्तम भान असे. त्यामुळे त्याच्या भेटीचे योग अनेक आले. भरपूर काम केल्यावर डेव्हिड धवनने थांबण्याचा निर्णय घेऊन तो अंमलात आणला हे विशेष उल्लेखनीय.
आपण कायमच प्रेक्षकांच्या मनसोक्त मनमुराद आनंदासाठीच ‘पिक्चर’ बनवतो असा स्पष्ट फोकस ठेवून यशस्वी ठरलेल्या डेव्हिड धवनला फिल्म फेअरने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले हा ‘थिएटरमध्ये टाळ्या नि शिट्ट्यांनी त्याचे टाईमपास पिक्चर एन्जाॅय केलेल्या पब्लिकचा गौरव आहे’.
– दिलीप ठाकूर