देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींच्या 'या' ट्विटमुळे महायुतीत वादाची ठिणगी? जाणून घ्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या मदतीने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. ८ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. आता विरोधकांच्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. सिंधुदुर्गमधील घटनेनंतर या पुतळ्याचे भग्न अवस्थेतील काही फोटो व्हायरल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा हे फोटो व्हायरल करणार नाही, असे फडणवीस म्हणाले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कोसळलेल्या पुतळ्याचे फोटो ट्विट करत महायुती सरकारलाच प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दुःखद बाब आहे. यावर कोणीही राजकारण करू नये. पुतळा उभा करताना राजकोट किल्ल्यावरील वाऱ्याचे आकलन शिल्पकाराला समजले नसावे. आता आम्ही त्या ठिकाणी नौदलाच्या मदतीने नवीन पुतळा उभा करू. सिंधुदुर्गमधील घटनेनंतर या पुतळ्याचे भग्न अवस्थेतील काही फोटो व्हायरल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा हे फोटो व्हायरल करणार नाही. अफझलखानासारख्या कितीही प्रवृत्ती चालून आल्या तरी आम्ही लोकशाही पद्धतीने त्यांचा कोथळा बाहेर काढू.
मिटकरींनी काय म्हणाले ?
महाराज माफ करा. कुण्या तोंडानं माफी मागावी? महाराष्ट्राचा इतिहास ज्या नावाने दैदीप्यमान बनवलाय त्याच राजांचा पुतळा असा कोलमडुन पडावा? आणखी मोठा पुतळा उभारताय,मात्र ज्याला कंत्राट दिलं त्याची गुणवत्ता का तपासली नाही? हे चित्र वेदनादायी व असह्य आहे. कुण्या तोंडाने माफी मागावी.
महाराज माफ करा 🙏🏼 कुण्या तोंडानं माफी मागावी? महाराष्ट्राचा इतिहास ज्या नावाने दैदीप्यमान बनवलाय त्याच राजांचा पुतळा असा कोलमडुन पडावा? आणखी मोठा पुतळा उभारताय,मात्र ज्याला कंत्राट दिलं त्याची गुणवत्ता का तपासली नाही? हे चित्र वेदनादायी व असह्य आहे. कुण्या तोंडाने माफी मागावी 😔 pic.twitter.com/5gEiihuzvc
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 27, 2024
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या मदतीने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे.