अयोध्येतील भव्य श्री राम मंदिराचे (Ayodhya Sri Ram Mandir) बांधकाम वेगाने सुरू असून जानेवारी 2024 पासून सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं होणार आहे.तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी एकट्या देशातून 3500 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. यापैकी लाखो लोक आहेत ज्यांनी केवळ 10 रुपयांचे योगदान दिले आहे.
जानेवारी 2024 जसजसा जवळ येत आहे तसतशी अयोध्येतील भव्य कार्यक्रमाची उत्सुकताही वाढत आहे. भगवान रामाचे भक्त नवीन भव्य राम मंदिरात पूजा करण्याच्या संधीची आतुरतेने वाट पाहत आहेत. अद्वितीय कारागिरी आणि अभियांत्रिकीचा दाखला असलेले हे विलक्षण मंदिर केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील लाखो उपासकांसाठी तयार होणार आहे. सध्या बांधकामाचे काम जोरात सुरू आहे. हे मंदिर 2.7 एकर जागेत 54,700 चौरस फूट क्षेत्रफळावर बांधले जात आहे. याचे नेतृत्व श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष आणि भारताच्या पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या उभारणसाठी देशभरातून मोठ्या प्रमाणावर देणग्या देण्यात आल्या. राम मंदिर ट्रस्टने 3500 कोटी रुपये जमा केले आहेत. त्यातून लोकांच्या विश्वासाची पातळी दिसून येते. यावरून हे देखील दिसून येते की लोकांचा विश्वास आहे की ते देत असलेल्या योगदानाचा बांधकामात चांगला उपयोग होईल.
सध्या राम मंदिराच्या तळमजल्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यात एकूण 162 खांब करण्यात आले आहेत. आता या खांबांमध्ये 4500 हून अधिक मूर्ती कोरल्या जात आहेत. यात त्रेतायुगाची झलक पाहायला मिळणार आहे. यासाठी केरळ-राजस्थानमधून 40 कारागिरांना पाचारण करण्यात आले आहे.
वास्तुविशारद अभियंता अंकुर जैन यांनी सांगितले की, – प्रत्येक खांब 3 भागात विभागलेला आहे. प्रत्येक खांबावर 20 ते 24 मूर्ती कोरल्या जात आहेत. वरच्या भागात 8 ते 12 मूर्ती बनवल्या जात आहेत. मधल्या भागात 4 ते 8 तर खालच्या भागात 4 ते 6 मूर्ती कोरल्या जात आहेत. एका कारागिराला एका स्तंभावर मूर्ती कोरण्यासाठी सुमारे 200 दिवस लागतात.