अयोध्येमध्ये येत्या 22 जानेवारी रोजी (Ayodhya Ram Mandir inauguration) शतकांची स्वप्नपूर्ती होणार आहे. प्रभू श्री रामांची पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. भव्य व दिव्य अशा या सोहळ्यासाठी देशभरामध्ये जय्यत तयारी सुरु असून तब्बल 8 हजार पाहुण्यांना देशातून आणि अगदी परदेशातून आमंत्रित (Ram Mandir Invitation) करण्यात आले आहे. या मानाच्या आमंत्रणामध्ये महाराष्ट्रातील एका गावाच्या सरपंचाचा देखील समावेश आहे.
राम मंदिर उद्घाटन सोहळ्यातील आमंत्रणावरुन राज्यामध्ये राजकारण रंगले आहे. शिवसेना (उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आमंत्रण मिळत नसल्यामुळे जोरदार वादंग निर्माण झाला होता. मात्र आता महाराष्ट्रातील एका गावाच्या सरपंचांना राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील लोकप्रिय व आदर्श गाव म्हणून नावाजलेले हिवरे बाजार या गावातील सरपंचांना राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
हिवरे बाजार गावातील लोकप्रिय सरपंच पोपटराव पवार यांना राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. अमेक दिग्गजांना मिळालेल्या आमंत्रणामध्ये हिवरे बाजार गावाच्या सरपंचांचा देखील समावेश आहे. पोपटराव पवार यांनी 1989 सालापासून गावामध्ये क्रांती करत आदर्श गाव म्हणून नावलौकीक मिळवला. पाणी टंचाई, वीज पुरवठा व शेतीविषय समस्यांवर मात करत या गावाने सर्वांपुढे आदर्श निर्माण केला. या कार्यामुळे गावाचे सरपंच पोपटराव पवार यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
हिवरे बाजार गावाचे सरपंच पोपटराव पवार यांच्यासह जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देखील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. अहमदनगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक रवींद्र साताळकर आणि नाशिक विभागाचे संपर्कप्रमुख घनश्याम दोडिया यांनी अण्णा हजारेंना निमंत्रण पत्रिका दिली.