
कोल्हापूर : पूरस्थिती दरवर्षी निर्माण होत आहे. यामुळे काही ठिकाणी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. यंदाचे महापुराचे संकट भयंकर आहे. राज्यातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करायचा नाही. सातत्याने पूरबाधित नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन गरजेचे आहे. यासाठी लवकरच मुंबईत सर्वपक्षीय बैठक घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात दिली. ‘मी पॅकेज देणारा मुख्यमंत्री नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे’, अशा शब्दांत त्यांनी पूरग्रस्तांना भरीव मदतीचा शब्द दिला.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. शिरोळ तालुक्यातील पूरबाधित ठिकाणे, कोल्हापूर शहरातील पूरगस्त ठिकाणाची पाहणी केली. पूरस्थितीबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. पूरनियंत्रणाच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने बोलताना ठाकरे यांनी संरक्षित भिंत बांधणे हा ही एक पर्याय असल्याचे नमूद केले.
पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, ‘यंदाचे संकट भयंकर आहे. पुरामुळे शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महापुरासोबत कोरोना महामारीशी लढाई सुरू आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या संकटावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. जीवितहानी टाळण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. पूरनियंत्रण आणि कायमस्वरुपी उपाययोजनेसंबंधी मुंबईत सर्वपक्षीय बैठक घेऊ. अभ्यास करुन योग्य आराखडा तयार करणार आहे.
जनतेच्या जीवाशी खेळायचे नाही
‘पूररेषेच्या आतील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय ब्ल्यू व रेडलाईन पुढे बांधकामांना परवानगी नाही. राज्याच्या जनतेच्या जीवाशी खेळायचे नाही. पूरस्थितीवरुन कसलेही राजकारण करायचे नाही. यामुळे कसल्याही वेड्यावाकड्या घोषणा करणार नाही. वेडीवाकडी मदत केंद्राकडे मागणार नाही. जेव्हा गरज लागेल तेव्हा केंद्राकडे मदत मागू. दरम्यान, केंद्राने बँका, विमा कंपन्यांना तत्काळ सूचना देण्याची गरज आहे. यासंबंधी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना पत्र लिहिले आहे. विमा कंपन्यांनी ५० टक्के रक्कम तत्काळ देण्याची गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.