सातारा : राष्ट्रवादी काॅंग्रेस (Nationalist Congress Party) वाढावी यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत असताे. सातारा जिल्ह्यात देखील राष्ट्रवादीच्या मजबूतीसाठी माझे प्रयत्न सुरु असतात. त्यातून काेणाच्या भावना दुखवल्या जात असतील तर माझा नाईलाज आहे. यापूर्वी जावळीत मी लक्ष घातले नव्हते. परंतु, आता जावळीत राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याकरिता आता मी स्वतः लक्ष घालणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी नमूद केले. दरम्यान भाजप आमदार शिवेंद्रसिंहाराजे भाेसले (Shivendra Raje Bhosale) यांनी माझ्यासाठी प्रयत्न केल्याचे शिंदेंनी नमूद केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी (Satara District Bank Election) आज (रविवार) विविध तालुक्यांत मतदानाची प्रक्रिया सुरु आहे. जावळीत आमदार शिंदे गट व प्रतिस्पर्धी रांजणे गट यांच्यात तणाव झाला. दाेन्ही गटातील नेते, पाेलिसांच्या आवाहानानंतर तणाव निवळला.
यावेळी पत्रकारांशी बाेलताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, प्रतिस्पर्धी उमेदवार ज्ञानदेव रांजणे हे तांत्रिकदृष्टया राष्ट्रवादीत आहेत. अन्य सर्व लाेकांना ते माहित आहे. मतदान प्रक्रियेच्या काळात फार माेठा राडा झाला नाही. केवळ बाचाबाची झाली. नंतर ती आम्ही मिटवली.
जावळीत लक्ष घालणार
मी अजूनपर्यंत जावळीत लक्ष घातले नव्हते. आता यापुढे लक्ष घालीन, असे एका प्रश्नास उत्तर देताना आमदार शिंदेंनी स्पष्ट केले. जावळीतील जनता १०० टक्के माझ्या पाठीशी आहे. काही स्वार्थी आहेत. ते गेले. आम्ही पुन्हा येथे राष्ट्रवादीची ताकद उभी करु. माझे भाग्य आहे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वाे शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जिल्हाभरातील सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले आहेत, असे शिंदेंनी नमूद केले.
मी पक्षाशी एकनिष्ठ
सर्वांनी सांगून सुद्धा ज्येष्ठांचे ऐकले गेले नाही. याेग्य वेळीस खुलासा केले जाईल. मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. प्रयत्न करणे माझ्या पक्षासाठी मी लढत राहताे. सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांची नाळ माझ्याशी जाेडली गेली आहे. भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी तुमच्यासाठी प्रयत्न केला. त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांचे का ऐकले नाही याचा उलगडा हाेत नाही. त्यांनी प्रयत्न केला ही वस्तुस्थिती आहे. प्रयत्न केल्याने लाेक मानत नसतील तर उद्याचा संघर्ष हा त्या लाेकांबराेबर असेल असे आमदार शशिकांत शिंदे यांनी नमूद केले.