लंडन – चिकन टिक्की, पनीर चिल्ली यासारखे भारतीय मसालेदार पदार्थ आवडणाऱ्या इंग्लंडमधील शौकिनांना आता खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. ही भारतीय पक्वान्ने तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि मसाले यांच्या किमती होलसेल बाजारात चांगल्याच वाढल्या आहेत. यासह ट्रान्सपोर्ट खर्चही वाढला असून, सध्या इंग्लंडमध्ये शेफ आणि कर्मचारी यांची संख्या अपुरी आहे.
भारतीय मसालेदार पदार्थ जगात अनेक देशांत लोकप्रिय आहेत. या मसालेदार पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या एका फर्मने सांगितले की हे पदार्थ तयार करण्यासाठीचे मसाले सुमारे ५० टक्क्यांनी महागले आहेत. आलं आणि लसूण यांच्या किमतीही गेल्या सहा महिन्यात ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर पालक, हिरवी मिरची, शिमला मिरची यांचे दामही २५ टक्क्यांनी वाढले आहेत. याबरोबरच चांगले शेफ मिळत नसल्याची चिंता डोक्यावर आहेच. ट्रान्सपोर्ट आणि पॅकेजिंगच्या खर्चातही ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अशा स्थितीत भारतीय खाद्यपदार्थांची हॉटेल्स चालवणे, सोपे राहिलेले नाही. त्यामुळे दरवाढ करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय उरले नसल्याचे मालक सांगतायेत. वाढत्या महागाईमुळे चिकन टिक्का, आलू साग, बटर चिकन यांच्या किमती ५० टक्क्यांनी महागणार आहेत. प्रति प्लेट किमतीत १०२ रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. खाद्य तेलापासून मसाल्यापर्यंतच्या किमतीत सरासरी २५ ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आत्ता जर भाव वाढवले नाही तर पदार्थांच्या चवीसोबत तडजोड करावी लागणार आहे.
दुसरीकडे हॉटेल इंटस्ट्रीसमोर मनुष्यबळाचेही संकट आहे. चांगले शेफ आणि कुशल कारागीर मिळत नाहीयेत. त्यामुळे २० टक्के जास्त वेतन देऊन अशा मंडळींना कामावर आणावे लागत आहे. इंग्लंडचा विचार केला तर २ लाख कामगारांची आवश्यकता आहे. सुमारे १० टक्के कामगार कमी असल्याची माहिती समोर आली आहे.