सिंगापूर: जागतिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळवून मीराबाई चानू जिद्दीचे दर्शन घडवले आहे. खरंतर रिओ ऑलिम्पिकमध्येच तिच्याकडून पदकाच्या अपेक्षा होत्या, परंतु तिथे अपेक्षित कामगिरी न करता आल्यामुळे ती निराश झाली होती. अपयशामुळे एखादा खेळाडू खचू शकतो, परंतु मीराबाई चानू खचली नाही, तर ते अपयश मागे टाकून नवे शिखर सर करण्यासाठी इरेला पेटली. जागतिक स्पर्धा ही तिच्यासाठी संधी होती. सुवर्णपदक मिळवून तिने या संधीचे खरोखर सोने केले. तिचे हे यश व्यक्तिगत तिच्यासाठी महत्त्वाचे आहेच, परंतु भारतीय क्रीडाक्षेत्रासाठीही मोलाचे आहे.
सिंगापूर वेटलिफ्टिंग आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही यावर्षी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा आहे. या स्पर्धेत प्रत्येक वजन गटातील अव्वल आठ वेटलिफ्टर्स थेट राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.
चानू प्रथमच ५५ किलो वजनी गटाच्या स्पर्धेत सहभागी झाली आहे. या स्पर्धेत तिने १९१ किलो (८६ किलो आणि १०५ किलो) वजन उचलले. तिला कोणत्याही खेळाडूकडून आव्हान मिळाले नाही. मीराबाईनंतर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाची जेसिका सेवास्टेन्को आहे. जेसिकाने मीबराबाई खालोखाल १६७ किलो (७७ किलो आणि ९० किलो) वजन उचलले. त्यानंतर मलेशियाच्या अॅली कॅसांड्रा एंजेलबर्टने १६५ किलो (७५ किलो आणि ९० किलो) वजनासह तिसरे स्थान पटकावले.