अर्शद वारसीच्या 'जोकर' कमेंटवर नाग अश्विनने दिली प्रतिक्रिया
नाग आश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. चित्रपटाला थिएटरमध्ये दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ओटीटीवरही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात प्रभास जोकरसारखा वाटतोय असं वक्तव्य बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने केलं होतं. आता बॉलिवूड अभिनेत्याच्या वक्तव्यावर ‘कल्की 2898 एडी’चे दिग्दर्शक नाग अश्विनने प्रतिक्रिया दिली आहे.
अर्शद वारसीच्या वक्तव्यामुळे दिग्दर्शक नागआश्विन नाराज झाले आहे. दिग्दर्शकाने एक्स हँडलवरून पोस्ट शेअर करत निषेध व्यक्त केला आहे. ट्विटमध्ये लिहिले की, “जास्त मागे जाऊ नका. आता उत्तर-दक्षिण किंवा बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड नव्हे तर आपण याकडे व्यापक नजरेने बघायला हवं.. युनायटेड इंडियन फिल्म इंडस्ट्री, अर्शद साहेबांनी आपले शब्द जरा जपून वापरायला हवे होते. पण ठिकेय. मी अर्शदच्या मुलांसाठी लवकरच खेळणी पाठवत आहे. त्यासोबतच मी प्रभासला ‘कल्की 2898 एडी’मध्ये सर्वोत्तम दाखवण्यासाठी कठोर मेहनत घेईल.”
अर्शद वारसीने नुकताच एका मुलाखतीत प्रभासची तुलना जोकरसोबत केली होता. “मी कल्की पाहिला, पण मला तो चित्रपट अजिबात आवडला नाही. पण चित्रपटात बिग बी बच्चन यांनी अप्रतिम काम केले आहे. त्यांच्यासारखी शक्ती जर आपल्याला रियल लाईफमध्ये मिळाली ना, तर आपलं आयुष्य सेटच आहे मग. पण मला प्रभासचे काम पाहून फार वाईट वाटलं.”
हे देखील पाहा – शोच्या एक्झिटवर ‘अब्दुल’ची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला अभिनेता?
“चित्रपटात प्रभास एक जोकरसारखाच वाटत होता. मला मॅड मॅक्स बघायचा आहे. मला मेल गिब्सनला तिथे बघायचे आहे. तुम्ही त्याला काय बनवलं? असे का करता? मला खरंच कळत नाही.” अर्शद वारसीच्या या वक्तव्यानंतर सुपरस्टार नानीसह अनेक चित्रपट निर्माते आणि अभिनेत्यांनी अर्शद वारसीला फटकारले.