सोनई / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : नेवासा तालुक्यातील गोमळवाडी, निंभारी, वाटापूर परिसरात बिबट्याने पाच-सहा महिन्यांपासून अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या कालावधीत त्याने सुमारे वीस शेळ्या, घोडी, कुत्री, लहान वासरे यांच्यावर हल्ला करत फाडशा पाडला होता. मात्र, गोमळवाडी येथील बाचकर वस्तीवर शिकारीसाठी आलेला नर बिबट्या मात्र ‘खुद शिकार हो गया’.
शनिवारी पहाटे चारच्या दरम्यान बिबट्या बाचकर यांच्या वस्तीवर आला. शिकारीसाठी कोंबड्याच्या जाळीत शिरला. कोंबड्या ओरडल्याने मच्छिंद्र बाचकर यांना जाग आली. बिबट्या जाळीत शिरलेला पाहता त्यांनी धाडस दाखवत जाळीचा दरवाजा बंद करत शेजारच्या वस्तीवरील लोकांना कळविले. ऍड. सुदाम ठुबे यांनी त्वरीत वनविभागाशी संपर्क साधून माहिती कळविली. यावेळी शेजारील तुकाराम बाचकर व ठुबे यांनी बिबट्या अडकलेली कोंबड्याची जाळी दाव्याने बांधली.
सकाळी वन विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होत बिबट्या वनविभागाच्या गाडीत निवारा केंद्रात सोडण्यासाठी घेऊन गेले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता इतर अधिकाऱ्यांचा नंबर देत संपर्क साधण्याने सांगितले. मात्र, अनेक वेळा संपर्क साधूनही संबधितांनी फोन उचलला नाही. यावरुन वनविभागात सावळा गोंधळ चालू असल्याचे दिसून आले.
सध्या गहुची भरणी, उस लागवड व ऊस तोडणी, कांदा लागवड चालू असल्यामुळे शेतात जाण्यासाठी शेतकरी घाबरत आहेत. दिवसेंदिवस बिबट्याची भीती वाढतच चालली आहे. परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बिबट्या हल्ला करून पसार होताना दिसत आहे. परिसरात आणखी दोन बिबट्यांचा पिलांसह वावर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली.
ग्रामस्थांकडून बाचकर यांचा सत्कार
धाडस दाखवत कोंबड्याच्या जाळीत बिबट्याला बंद करण्याचे धाडस दाखविल्याने मेजर चोपडे व इतरांनी मच्छिंद्र बाचकर
यांचा सत्कार केला. मात्र, वनविभागाला साधे कौतुक करण्याचा वेळ भेटला नाही.