PM Modi to Inaugurate New NCA Academy
PM Modi to Inaugurate New NCA Academy : बीसीसीआयचे विद्यमान सचिव जय शाह यांनी काही आठवड्यांपूर्वी जाहीर केले होते की, एक नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) लवकरच बंगळुरूमध्ये उघडणार आहे, जी जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असेल. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, बीसीसीआयने 29 सप्टेंबर रोजी वार्षिक बैठक बोलावली आहे आणि त्याच दिवशी नवीन अकादमीचे उद्घाटनदेखील केले जाईल, अशी अटकळ आहे. पण आता बातमी अशी आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन NCA चे उद्घाटन करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असलेल्या एनसीएचे करणार उद्घाटन
एका प्रसिद्ध वृत्तपत्रानुसार, बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असलेल्या एनसीएचे उद्घाटन करणार आहेत. काही दिवसांपूर्वी, एका मुलाखतीत, जय शाह एनसीएमधील नवीन सुविधांबद्दल खूप उत्साहित होते आणि त्यांनी सांगितले की ही अकादमी ऑलिम्पिक खेळाडूंसाठी देखील खुली असेल. अलीकडे, व्हीव्हीएस लक्ष्मण एनसीए अध्यक्षपदावर कायम राहण्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते, परंतु जय शाह यांनी लक्ष्मण अध्यक्षपदावर कायम राहतील असे स्पष्ट केले होते.
नवीन एनसीएमध्ये या सुविधा असतील
ऑगस्ट महिन्यात जय शाह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते की, नवीन एनसीएमध्ये अनेक सुविधा दिल्या जातील. त्यामध्ये तीन आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट मैदाने असतील, 45 सराव खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या असून त्यामध्ये इनडोअर क्रिकेट खेळपट्ट्याही उपलब्ध असतील. ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव तयार करण्यात आला असून क्रीडा शास्त्राशी संबंधित सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
काय म्हणाले जय शाह
शाह यांनी असेही सांगितले की नवीन एनसीएसाठी जमीन 2008 मध्येच खरेदी केली गेली होती, परंतु बीसीसीआयच्या पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी त्या दिशेने ठोस पावले उचलली नाहीत. याशिवाय दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा यांनाही जय शाह यांनी बेंगळुरू येथे येऊन अकादमीतील नवीन सुविधांचा आनंद घेण्याचे आवाहन केले.






