पुणे : महानगरपालिकेने पुण्यात इतर राज्यांमधून पुण्यात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी नवे नियम लागू केले आहेत. इतर राज्यांमधून पुण्यात येणाऱ्या नागरिकांनी जर कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर त्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असणार नाही.
पुणे महानगरपालिकेने जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नसली तरी, ज्यांचं लसीकरण अद्याप झालेलं नाही त्यांना मात्र मागील ७२ तासांमधला आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा अशा प्रवाशांना शहरात प्रवेश केल्यानंतर १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात येईल.
दुकाने, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिकांनी आपल्या संपूर्ण स्टाफसह लसींचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक असणार आहे. याबाबत माहिती देताना पालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, दुकाने, कार्यालये, औद्योगिक क्षेत्र, हॉटेल्स, बार, मॉल या ठिकाणी काम करणाऱ्या सर्वांनी लसीचे दोन डोस घेणं अनिवार्य आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी हे कर्मचारी कामावर रुजू होऊ शकतात.
चित्रपटगृहे, मंदिरे अद्यापही बंदच
राज्य शासनाच्या निर्देशांनुसार पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शनिवारी सुधारित आदेश जारी केले. करोनाच्या दीर्घकाळ र्निबधांनंतर रविवारपासून (१५ ऑगस्ट) पुणे आणि पिंपरीतील व्यावसायिकांना व्यवसायाचे स्वातंत्र्य मिळणार आहे. नव्या नियमांनुसार करोना प्रतिबंधक उपाययोजना करून दुकाने, मॉल आणि उपाहारगृहे आठवडय़ाचे सर्व दिवस रात्री दहापर्यंत खुली राहणार असून चित्रपटगृहे, नाटय़गृहे आणि मंदिरे पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहतील.