मुंबई : लालबाग, करीरोड परिसरामधील ‘वन अविघ्न पार्क’ या आलिशान इमारतीला दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग लेव्हल तीनची असल्याचं सांगण्यात येत आहे. वन अविघ्न पार्क ही इमारत भारत माता सिनेमागृह शेजारी आहे. लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारी ही इमारत ६० मजल्यांची असून, १९ व्या मजल्यावर आग लागली आहे. आग लागल्यानंतर काहींनी खाली उड्या मारल्याची दृष्यही समोर आलं आहे. एक व्यक्ती गॅलरीला लटकून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच खाली पडल्याचंही दिसून आलं आहे.
१९व्या मजल्यावरुन पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू
दरम्यान १९व्या मजल्यावरुन पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला आहे, स्थानिक आमदार अजय चौधरींनी ही प्राथमिक माहिती दिली आहे. पाचव्या माळ्यावर आग लागल्यानंतर ती पसरली आणि १९ व्या माळ्यापर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. या भागामधील गल्ल्या आणि रस्ते अरुंद असून त्यामुळं अग्निशामन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहचायला वेळ लागल्याचे समजते. तसेच आग १९ व्या मजल्यावर असल्याने तिथपर्यंत पोहचण्यास आखणीन वेळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
Mumbai | Level 3 fire broke out at Avighna park apartment, Curry Road around 12 noon today. No injuries reported: Mumbai Fire Brigade
— ANI (@ANI) October 22, 2021
तातडीने अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरू केले आहेत. राहिवाश्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी दलाचे प्रयत्न सुरू आहेत. या उंच इमारतीमधील लोकांना वाचविण्याचे आणि आग विझविण्याचे मोठे आव्हान अग्निशमन दलापुढे आहे. वारा असल्यामुळे आग पसरत चालली असल्याचे दलाचे जवान सांगत आहेत. धुराचे लोट दिसत आहेत. आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन या घटनेची पाहणी केली आणि आग आटोक्यात आणण्यासाठी सूचना केल्या. आग अजूनही सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.