सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्देश्वर महाराजांची यात्रा (Siddheshwar Yatra) भरविण्याबत प्रशासन सकारात्मक असून, धार्मिक विधी व अक्षता सोहळ्यासह अन्य कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत महापालिका व पोलीस प्रशासनाकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यानंतर लवकरच यात्रा आयोजनाबाबत धोरण ठरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांनी दिली.
बुधवारी, जिल्हाधिकारी कार्यालयात महापालिका व श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीने यात्रा भरविण्याबाबत दिलेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत प्राथमिक चर्चा करण्यात आली. या बैठकीला महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस आयुक्त हरीश बैजल, उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा दरवर्षी जानेवारी महिन्यात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात भरते. यात्रा सोहळ्याला या पारंपरिक अनन्यसाधारण महत्त्व असून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भक्तगण या अलौकिक अशा सोहळ्यात सहभागी होतात. गेल्या वर्षी यात्रेवर कोरोनाचे सावट होते. यंदा मात्र कोरोनाचे सावट कमी झाले असले तरी नव्याने आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रशासनाला काहीअंशी भीती आहे. त्यामुळे यात्रा भरविण्याबाबत प्रशासन सकारात्मक असले तरी काही निर्बंध लावून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात आले.
विशेष करून अक्षता सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन त्याविषयी विशेष सूचना मागविण्यात आल्या आहेत. कमी भक्तांच्या संख्येत यात्रा भरविण्याकडे प्रशासनाचा कल आहे. या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून येणाऱ्या भक्तांना रोखण्याबाबतही प्रशासन विचार करीत आहे. आजच्या बैठकीत अंतिम निर्णय झाला नसला तरी यात्रा भरविण्याबाबत प्रशासन सकारात्मक असून, आता पोलीस व महापालिकेच्या पुढील सूचना व अभिप्रायानंतरच पुढील धोरण ठरविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी स्पष्ट केले.