वाई : वाईच्या पश्चिम भागातील जोर या गावावर ऐन बेंदूर या सणाच्या दिवशी २२ जुलैला दिवस रात्र मुसळधार पाऊस पडत असताना केळाचे नकाड हा डोंगरा कोसळताना पाहणाऱ्या अनिता पांडुरंग सपकाळ (वय ३५) मुलगा सचिन पांडुरंग सपकाळ (वय २०) या दोघांनी आरडाओरडा करत वस्तीवरील जवळपास ३० माणसं घराबाहेर काढण्यास यश मिळवले होते. पण दुर्दैवाने डोंगर उतारा भरघाव वेगाने वरुन झाडे दरड आणि मातीचा ढिगारा कोसळून लगतच असणारा पोवाचा ओढ्यातून आलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याबरोबर मातीच्या लाटा आणि मोठंमोठी दरडी अनिता यांच्या शरीरावर आदळल्याने क्षणार्धात त्या मातीच्या लाटांसोबत वाहून जात होत्या.
अनिता यांचा मुलगा सचिनने पाहिले आणि त्याने क्षणाचाही विचार न करता आईला वाचविण्यासाठी त्या वेगवान मातीच्या लाटेत उडी टाकली. पण नियतीला हे मान्य नसल्यानेच काळाने या आई आणी मुलावर झडप घातली आणि ही मायलेकरं क्षणार्धात धोमबलकवडी धरणातील मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. पती पांडुरंग सपकाळ चुलत भाऊ नारायण सपकाळ यांनी शेकडो ग्रामस्थांच्या मदतीने आपल्या पत्नीचा आणि मुलाचा शोध सुरु केला. पण दुर्दैवाने त्यांना आज ११ दिवस उलटले तरी ते जिवंत किंवा मृत अवस्थेत सापडले नसल्याने जोर गावावर शोककळा पसरली आहे.
जिल्हाधिकारी आणि वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूर आणि तहसीलदार रणजित भोसले यांना या गंभीर घटनेची माहिती मिळताच या मायलेकरांचा गतीने शोध घेण्यासाठी पुण्यातून एनडीआरफची टीम मागवली. पण जोर गावाकडे जाणारे पुल वाहून गेल्याने त्या गावापर्यंत या टीमला मुसळधार पावसामुळे जलद पोहोचणे अवघड झाल्याने अखेर या टीमला घेऊन स्वत:च्या जिवाची पर्वा न करता महिला प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूर, तहसीलदार रणजित भोसले हे दोन्ही जबाबदार अधिकारी टीमसोबत धोम बलकवडी धरणावर पोहचले.
तहसीलदार धरणाच्या भिंतीवर थांबले तेथून पुढे प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूर एनडीआरफच्या बोटीव्दारे या जवानांना घेऊन जोर गावातील भर पाऊसात घटनास्थळावर दाखल झाल्या आणि शोध मोहीम सुरू झाली. पण मृतदेह हाती लागले नाहीत. पण वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूर यांनी हार न मानता हे मृतदेह शोधुन काढण्यासाठी पुन्हा २९ जुलै रोजी आणखी एक २४ जवानांची एक टीम मागवून पुन्हा शोध मोहीम सुरू केली होती. त्या जवानांनी दोन पोकलेन मशीनच्या साह्याने गेली दोन दिवस मृतदेह शोधण्यासाठी अतिशय परिश्रम घेतले. पण धरणात गाळाचे आणि खोलीचे प्रमाण जास्त असल्याने पोकलेन मशीन गाळात कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्याने या जवानांनी ३० जुलैच्या रात्री शोध मोहीम थांबवून परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बेपत्ता असलेल्या अनिता पांडुरंग सपकाळ आणि त्यांचा मुलगा सचिन पांडुरंग सपकाळ या दोन्ही मायलेकर जीवंत आहेत की त्यांचा मृत्यू झाला, हे सांगणे सध्या तरी वाई महसूल प्रशासनाला सांगणे अवघड आहे.