नीट परिक्षेवरुन प्रणिती शिंदेंचा मोदी सरकारवर निशाणा
सोलापूर : देशामध्ये सध्या नीट परिक्षेच्या गोंधळावरुन राजकारण तापले आहे. लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून पहिल्याच दिवशी नीट परिक्षेवरुन गदारोळ निर्माण झाला. देशातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नीट परिक्षेच्या गोंधळावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. यावर आता कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. नीट परिक्षेबाबत मोदी सरकार अतिशय निगरगट्ट आहे, अशी घणाघाती टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
दिल्लीमध्ये लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज वित्तमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यापूर्वी खासदार प्रणिती शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या, लोकसभेमध्ये नियम 193 अंतर्गत जी चर्चा झाली, ती सुद्धा नीट परिक्षेवर घेण्यात आली नाही. ती चर्चा केवळ ऑलिम्पिकवर घेण्यात आली. या नियमानुसार प्रत्येक सत्रात एकदाच चर्चा होऊ शकते. त्यामुळे नियम 193 अंतर्गत नीटवर चर्चा व्हावी, असा आमचा प्रयत्न होता. पण त्यांनी विरोधकांना काहीही न सांगता ऑलिम्पिकवर चर्चा ठेवली, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.
मोदी सरकार निगरगट्ट
पुढे त्यांनी नीट परिक्षेवरुन केंद्र सरकारला लक्ष्य केले. प्रणिती शिंदे म्हणाल्या, काल लोकसभेत नीटवर जी काही थोडीफार चर्चा झाली, त्यादरम्यान, शिक्षणमंत्री नीटचा पेपर लीक झाला हे मानायला तयारच नव्हते. आम्ही नीटच्या मुद्द्यावरून सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, सरकार यावर चर्चा करायला देखील तयार नाही. आम्ही नीटच्या मुद्द्यावरून शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागितला, पण ते नीटचा पेपर लीक झाला, हे मान्य करायलाच तयार नाहीत, यावरून हे सरकार किती निगरगट्ट हे लक्षात येते, असा घणाघाती आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.