हृदयविकाराच्या झटक्याने तेलंगणातील दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू
बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम मोठ्यांसह लहान मुलांच्या आरोग्यावर सुद्धा दिसून येत आहे. हल्ली हार्ट अटॅकमुळे लहान मुलानांच्या मृत्यूमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. अशीच एक घटना तेलंगणामध्ये सुद्धा घडली आहे. तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात 20 फेब्रुवारी रोजी सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला हार्ट अटॅक आला. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. 16 वर्षीय विद्यार्थिनी श्री निधी ही रामारेड्डी मंडळातील सिंगारायपल्ली गावची रहिवासी होती. तसेच ती शिक्षणासाठी कामरेड्डी येथे राहत होती. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, शाळेजवळ आल्यानंतर तिच्या छातीमध्ये दुखू लागले आणि ती खाली कोसळली.(फोटो सौजन्य – iStock)
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सगळ्यात आधी निधीला शाळेतील शिक्षकांनी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि त्याला सीपीआरसह प्राथमिक उपचार दिले, मात्र तिने सीपीआर देताना कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले. तिच्या मृत्यूमुळे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.
हल्ली लहान शाळेत जाणाऱ्या मुलांना किंवा किशोरवयनीं मुलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. या सगळ्याला चुकीची जीवनशैली, अपुरी झोप, तणाव इत्यादी अनेक गोष्टी जबाबदार आहेत. त्यामुळे शरीरात दिसून लागणाऱ्या सामान्य लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती तपासणी करून घ्यावी.
लहान मुलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. खेळ किंवा सामान्य शारीरिक हालचालींदरम्यान लहान मुलं लगेच थकून जातात. ही लक्षणे मुलांमध्ये दिसून आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे.
लहान मुलांना थोडाही चालल्यानंतर किंवा खेळल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे नेऊन तपासणी करावी. यामुळे मोठा अनर्थ टाळू शकतो.
शरीरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे, त्वचा निळी होऊ लागते. त्वचेसोबतच नखं सुद्धा निळी दिसू लागतात. लहान मुलांमध्ये असे कोणतेही लक्षणं दिल्यास डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा.
मुलांना शारीरिक हालचाली करताना छातीत वेदना किंवा दाब जाणवत असल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी. हृदयविकाराचा झटका येण्याआधी हृदयाचे ठोके खूप जलद, खूप मंद किंवा अनियमित वाटू लागतात.