आर्थरायटिस न होण्यासाठी काय खावे
सांधेदुखी हा हाडांशी संबंधित असा आजार आहे ज्यामध्ये सांध्यांना सूज, वेदना होतात आणि जडपणा येतो. वाढत्या वयाबरोबर ही समस्या वाढणे हे अधिक सामान्य आहे. परंतु योग्य आहार आणि जीवनशैलीचा अवलंब करून त्याचा धोका कमी करता येतो.
काही पदार्थांमध्ये जळजळ कमी करण्यास मदत करणारे पोषक घटक असतात आणि संधिवात लक्षणे नियंत्रित करू शकतात. आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांच्याकडून जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या खाल्ल्याने सांधेदुखीचा धोका कमी होतो. हे पदार्थ तुम्ही तुमच्या नेहमीच्या आहारात समाविष्ट करून घेणे तुमच्या फायद्याचे ठरू शकते. (फोटो सौजन्य – iStock)
हिरवीगार ब्रोकोली
ब्रोकोलीचा करा आहारात समावेश
ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन नावाचे संयुग असते, जे शरीरातील जळजळ कमी करण्यास आणि सांध्यांचे संरक्षण करण्यास मदत करते. हा घटक उपास्थिचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठीदेखील उपयुक्त आहे, ज्यामुळे संधिवात होण्याचा धोका कमी होतो. ब्रोकोली या भाजीमध्ये अनेक पोषक तत्व असून अन्य आजारांपासूनही ही भाजी तुम्हाला दूर ठेवण्यास मदत करू शकते.
ऑलिव्ह ऑईल
ऑलिव्ह ऑईल ठरेल वरदान
ऑलिव्ह ऑइलमध्ये ओलिक अॅसिड असते, जे एक शक्तिशाली अँटीइन्फ्लेमेटरी एजंट आहे. हे शरीरातील जळजळ कमी करते आणि संधिवाताची लक्षणे नियंत्रित करण्यास मदत करते. ऑलिव्ह ऑईल हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही नियमित जेवण ऑलिव्ह ऑईलमध्ये बनविल्यास तुम्हाला फायदा मिळू शकतो.
हेदेखील वाचा – हिप आर्थरायटिसचे विविध प्रकार, प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत!
फॅटी फिश
फॅटी फिश खावे
सॅल्मन, ट्यूना, मॅकरेल आणि सार्डिन सारख्या फॅटी माशांमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड भरपूर असतात. ओमेगा-३ फॅटी अॅसिड शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात, जे संधिवात लक्षणे नियंत्रित करण्यासाठी खूप महत्वाचे आहे. या माशांचे नियमित सेवन केल्याने सांध्यातील सूज कमी होते आणि दुखण्यापासून आराम मिळतो. याशिवाय फॅटी माशांमध्ये व्हिटॅमिन डी देखील पुरेशा प्रमाणात असते, जे हाडांसाठी फायदेशीर आहे.
अक्रोड आणि अळशी बी
अळशीची बी आणि अक्रोडचा आहारात करा समावेश
अक्रोड आणि अळशीच्या बिया देखील ओमेगा -3 फॅटी अॅसिडचा चांगला स्रोत आहेत. जर तुम्ही मासे खात नसाल तर अक्रोड आणि अळशीच्या बिया तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतात. त्यांचे सेवन सूज कमी करण्यास आणि सांध्यांची स्थिती सुधारण्यास उपयुक्त आहे. तुम्ही रोज सकाळी अक्रोड खावेत आणि अळशीच्या बियांची चटणी वा भाजी, पराठ्यातून सेवन करावे.
हेदेखील वाचा – ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिस आणि त्याचे महिलांवर होणारे परिणाम
बेरीज
विविध बेरीज खाव्यात
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरीसारख्या बेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात. या फळांमध्ये फायटोकेमिकल्स असतात, जे सांधेदुखीची लक्षणे कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.