Best Fan Speed While Sleeping (फोटो- सोशलमीडिया)
गरमीच्या दिवसात पंख्याशिवाय झोप लागणं कठीण आहे. घामामुळे चिपचिप होते आणि सारखी चुळबुळ होते. म्हणून बहुतेक लोक रात्री पंखा चालू करूनच झोपतात. कोणी फुल स्पीडवर ठेवतो तर कोणाला मंद हवा लागते. पण खरं तर रात्री झोपताना पंखा किती स्पीडवर असावा याचं काही एकच उत्तर नाही. तुमची खोली किती गरम आहे, हवेत किती ओलावा आहे आणि तुम्हाला किती उकाडा सहन होतो यावर सगळं अवलंबून असतं.
रात्री झोपताना पंखा एवढ्याच स्पीडवर ठेवा की अंगाला छान गारवा वाटेल. पण थंडी वाजता कामा नये. खूप लोक फुल स्पीडवर पंखा लावतात आणि मग मध्यरात्री थंडी वाजून जाग येते. जर तुमची खोली आधीपासूनच थंड असेल, खिडकीतून हवा येत असेल तर पंखा जास्त वेगाने लावायची गरज नाही. मंद किंवा मध्यम स्पीड एकदम पुरेसा होतो. रात्री 1-2 नंतर बाहेरचं तापमान आपोआप कमी होतं, त्यामुळे झोपताना स्पीड थोडा कमीच ठेवलेला बरा. याने झोप पण चांगली लागते आणि वीज पण वाचते. Best Fan Speed While Sleeping:
बऱ्याच लोकांची सवय असते पंख्याची हवा तोंडावर घेण्याची. हे चुकीचं आहे. एकाच जागी सतत हवा लागली तर सर्दी होते, मान दुखते, घसा सुकतो. पंखा असा ठेवा की त्याची हवा पूर्ण खोलीत फिरेल. सिलिंग फॅन असेल तर त्याची हवा सगळीकडे पसरते त्यामुळे ठीक आहे. पण टेबल फॅन किंवा स्टँड फॅन असेल तर तो एका जागी स्थिर न ठेवता फिरता ठेवा. म्हणजे हवा एकाच ठिकाणी लागणार नाही आणि खोलीत हवा खेळती राहील.
कधी कधी खोली खूपच गरम होते, दमटपणा जास्त असतो. अशा वेळी मंद पंख्याने काहीच वाटत नाही. मग मध्यम ते जास्त स्पीडवर पंखा ठेवावा लागतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, पंखा खोलीची हवा थंड करत नाही. AC सारखं तो काम करत नाही. तो फक्त तुमच्या शरीरावरचा घाम लवकर सुकवतो आणि त्यामुळे तुम्हाला थंड वाटतं. म्हणून खोली खूपच गरम असेल तर पंख्यासोबत खिडक्या उघड्या ठेवा म्हणजे बाहेरची हवा आत येईल.
जर तुम्ही पंखा लावून झोपल्यावर सकाळी नाक कोरडं पडत असेल, घसा दुखत असेल, वारंवार जाग येत असेल तर समजून जा तुमचा स्पीड जास्त आहे. प्रत्येक माणसाचं शरीर वेगळं असतं. कुणाला जास्त थंडी वाजते तर कुणाला जास्त गरम होतं. त्यामुळे दुसऱ्याचं बघून स्पीड ठरवू नका. तुम्हाला ज्यात आराम वाटेल तोच स्पीड ठेवा.
सगळ्यात चांगला उपाय म्हणजे मध्यम स्पीडवर पंखा ठेवा आणि अंगावर एक पातळ चादर घ्या. थंडी वाजली तर चादर घ्या, गरम झालं तर काढून टाका. याने झोप पण शांत लागेल आणि तब्येत पण बिघडणार नाही.






