
Cannes Festival 2026 In Marathi Celebrity : जागतिक पातळीवर सिनेसृष्टीतला सर्वात मोठा फेस्टिवल म्हणजे कान्स फेस्टिवल. आजवर भारतातून बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी या फेस्टिव्हलला हजेरी लावली. मात्र इतिहासात पहिल्यांदाच यावेळी सर्व मराठी कलाकरा एकत्र रेड कार्पेटवर झळकले. यामध्ये अशोक सराफ, अंकिता वालावलकर, प्राजक्ता माळी, निवेदिता सराफ, जंयती वाघधरे आणि केदार जोशी यांनी देखील रेडकार्पेटवर मराठीचा जलवा दाखवला आहे.
कान्समध्ये फॅशनला सर्वात जास्त महत्व असतं ते तुमच्या आऊटफिटला. या फेस्टिव्हलाला पारंपरिक मराठी लुक पाहून पाश्चिमात्य देशांनाही याची भुरळ पडली.
अशोक सराफ आणि निवेदिता जोशी
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर क्लासिक काळ्या पँटवर परिधान केलेल्या आयव्हरी रंगाच्या बंदगलामध्ये खूप प्रतिष्ठीत दिसत होते. बंदगलाची खासियत म्हणजे हा शाही लुक देतो. अशोक सराफ यांचा हा लुक कमाल होता. त्याचबरोबर निवेदिता सराफ यांचै भरजरी पैठणीतील लुक देखील एकदम रॉयल वाटत होता. फुलांचं नक्षीकाम असलेली पैठणी आणि जांभळ्या रंगाची पैठणी आणि त्यावर जर असलेली शाल यामध्ये निवेदिता सराफ यांचा लुक राजेशाही वाटत होता. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे दोघंही कान्सच्या रेड कार्पेटवर खूप सुंदर दिसत होते.
प्राजक्ता माळी
कान्सच्या रेडकार्पेटवर प्राजक्ता माळीच्या पारंपरिक लुकवर अनेकांच्या नजरा खिळून राहिल्या. अभिनेत्रीने आकाशी रंगांची नऊवारी नेसली. महाराष्ट्रीयन नथ, चोकर-स्टाईल नेकलेस, चंद्रकोर , कंबरपट्टा यांसारखे पारंपरिक दागिने परिधान करून महाराष्ट्रीयन संस्कृतीचा साज फिरंग्यांचा देशात अभिमनाने दिसत होता. आकाशी रंगाची नऊवारी त्यावर गडद निळ्य़ा रंगाचा ब्लाऊस आणि साडीला गुलाबी रंगाची किनार. प्राजक्ताचा हा मराठमोळी साज मन वेधून घेणारा होता. पारंपरिक दागिन्य़ांबरोबरच प्राजक्ताने हातावर काढलेली चंद्रकोर मेहंदी देखील उठून दिसत होती.
अंकिता वालावलकर
‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून नावारुपाला आलेली कंटेंट क्रिएटर अंकिता वाळवलकरनेही तिच्या अनोख्या स्टायलिंगमधून कान्सच्या रेड कार्पेटवर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पारंपरिक पैठणी आणि त्यावर स्लीव्हलेस स्ट्रॅपी ब्लाउज अंकिताने परिधान केला होता आणि त्यावर खास कोकणी पद्धतीने साडीचा पदर पाठीवर घेतला होता. फिकट गुलाबी रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचा ब्लाउज तसंच कपाळी नाजुकशी चंद्रकोर असा तिचा लुक होता जो महाराष्ट्राच्या किनारपट्टी संस्कृतीचं प्रतिनिधत्व करत होता.
जयंती वाघधरे
पारंपरिकतेतून आधुनिकतेकडे असलेला प्रवास असा काहीसा लुक जयंती वाघधरेचा होता. जयंतीने पांढऱ्या रंगाच्या पैठणीची शिवलेला गाऊन परिुधान केला. आकर्षक अशा मोराच्या डिझाईन्स या मराठी पारंपरिक संस्कृतीचं दर्शन घडवतं. नाकात नथ, गळ्यात चोकर कपाळावर चंद्रकोर आणि बिंदी, हातात खड्याच्या बांगड्या आणि ट्रेडिशनल इअररिंग्ज. याचबरोबर सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं ते तिच्या हातातील पर्सने. छत्रपती शिवरायांची प्रतिमा आणि जय महाराष्ट्र असं लिहिलेली तिची पर्स लक्ष वेधून घेत होती. ही पर्स पारंपरिक खणाच्या फॅब्रिकपासून तयार केलेली आहे.
केदार जोशी
काळ्या सुटवर केदार जोशी यांनी नांरगी पैठणीच्या कपड्याचं उपर्ण घेतलं होतं. गळ्यात पारंपरिक सोन्याचे दागिने देखील परिधान केले होते. त्यांचा हा लुक खूपच खास होता. कान्सच्या जागतिक पातळीवरील या फेस्टिव्हलमध्ये परंपरेने चालत आलेल्या मरामोळ्या संस्कृतीचा डंका वाजवला आहे.