गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
हार्ट अटॅक आणि अपचनाचा एकमेकांशी कोणता संबंध आहे?
हार्ट अटॅकची लक्षणे?
अपचनाच्या समस्या कशामुळे उद्भवतात?
Heart Attack: धावपळीची जीवनशैली, कामाचा तणाव आणि आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे ॲसिडिटी, अपचन आणि गॅसच्या समस्या कायमच उद्भवतात. छातीमध्ये जळजळ होणे किंवा आंबट ढेकर येणे ही अतिशय सामान्य समस्या झाली आहे. पण कायमच अपचनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. पचनसंस्था आणि हृदय या अवयवांचा एकमेकांशी संबंध आहे. पचनक्रिया बिघडल्यानंतर हृदयाच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम दिसू लागतो. त्यामुळे छातीत वाढलेला दाब, सतत अपचन किंवा छातीत वेदना होत असतील तर दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे. आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम थेट हृदयावर लगेच दिसून येतो. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयाच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतो.(फोटो सौजन्य – istock)
ॲसिडिटी, ॲसिड रिफ्लक्स आणि पोटात साचलेला गॅस इत्यादी लक्षणे पचनसंस्थेमध्ये बिघाड झाल्यास निर्माण होतात. पोटातील आम्ल अन्ननलिकेच्या दिशेने उलटे वाहू लागल्यास अन्ननलिकेच्या नाजूक अस्तराला दाह निर्माण होतो आणि छातीमध्ये जळजळ वाढू लागते. अन्ननलिका आणि हृदय हे अवयव एकमेकांच्या जवळ असल्यामुळे वाढत्या वेदनांमधील फरक ओळखणे अवघड होऊन जाते. हृदयाच्या स्नायूंना रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यामुळे पुरेसा ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे हृदयामध्ये वेदना होतात. त्यामुळे छातीत वाढलेली जळजळ किंवा वेदना गॅसची समजून दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.
गॅस किंवा अपचन कायमच जेवणानंतर किंवा उपाशी पोटी चहा, कॉफी, आंबट पदार्थांचे सेवन केल्यामुळे होते. अपचन झाल्यानंतर छातीच्या हाडांमध्ये जळजळ, तोंडात आंबट पाणी येणे, ढेकर येणे, पोट फुगणे, उलट्या, मळमळ किंवा डोकेदुखीचा त्रास होण्याची जास्त शक्यता असते. तर हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरात छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला प्रचंड दाब, आवळल्यासारखे वाटणे, जडपणा, घट्टपणा, अस्वस्थ करणाऱ्या वेदना, खांदे, पाठ, मान, जवडा किंवा पोटाच्या वरच्या भागात वेदना होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. दोन ते तीन महिने आधीपासूनच दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अपचन किंवा गॅस समजून दुर्लक्ष केले जाते. पण कालांतराने कोणत्याही वेळी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होऊ शकतो.
महिला कायमच अपचन किंवा गॅस, ॲसिडिटी झाल्यानंतर दुर्लक्ष करतात किंवा इनो, लिंबू पाणी पितात. पण या पेयाच्या सेवनानंतर पुन्हा एकदा त्याच समस्या उद्भवत असतील तर दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. कारण पुरुष आणि महिलांमध्ये हार्ट अटॅकची वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. मळमळ, उलटी, पोटाच्या वरच्या भागात वेदना आणि तीव्र थकवा तर काहीवेळा लक्षणे अस्पष्ट असतात. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
Ans: छातीत दडपण किंवा वेदना, श्वास घेण्यास त्रास, थंड घाम, मळमळ, चक्कर, असामान्य थकवा आणि वेदना हात, खांदा, पाठ, मान किंवा जबड्याकडे पसरणे अशी लक्षणे दिसू शकतात.
Ans: दोन्हींची लक्षणे काही वेळा सारखी असू शकतात, त्यामुळे केवळ लक्षणांवरून कारण ठरवणे सुरक्षित नाही.
Ans: छातीतील वेदना किंवा दडपण हात, खांदा, पाठ, मान, जबडा किंवा पोटाच्या वरच्या भागाकडे पसरू शकते. प्रत्येक व्यक्तीमध्ये लक्षणे सारखीच असतील असे नाही.






