पुणे/तेजस भागवत: आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा, आपले आई-वडील कोण असणार, आपण कोणाच्या घरी जन्म घेणार हे आपल्या हातात नसते. मात्र आयुष्यात कोणाशी मैत्री करावी हे आपण स्वतः ठरवत असतो. मैत्री म्हणजे आयुष्यभर साथ देणारी एक प्रेमळ गोष्ट आहे. अर्थात आज फ्रेंडशिप -डे आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप-डे साजरा केला जातो. मात्र एकाच दिवशी साजरा करण्याचा हा विषय नाहीये. ३६५ दिवस आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत मैत्री आपल्या सोबत असते आणि आपण ती जगत असतो.
बालवाडीत गेल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात नकळत अनेक जण आपले मित्र-मैत्रिणी होतात. त्यातील काही मित्र तर अगदी आपले जिगरी यार असतात, जे अखेरपर्यंत या नात्यात असतात. आज फ्रेंडशिप डे असल्याने माझ्या आयुष्यात असणाऱ्या मित्र-मैत्रीणींबद्दल व्यक्त व्हायचे ठरवले आणि आपसूकच मनात येणाऱ्या भावना लिहीत गेलो. आपले असे काही खास मित्र असतात ते म्हटले तर रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक जवळचे असतात. मैत्रीमुळे आपल्याला आयुष्यात खूप काही शिकायला, अनुभवायला मिळते.
अर्थात माझ्या आयुष्यात शाळेपासून आता कार्पोरेट क्षेत्रात नोकरी करत असताना अनेक जण ओळखीचे झाले. असं म्हणतात कधीच कोणी कोणाच्या आयुष्यात मुद्दाम येत नाही. कोण कोणाला भेटणार, कोण कोणाच्या आयुष्यात येणार हे विधिलिखित असते. आपल्या आयुष्यत येणारा प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवून जातो, अनुभव देऊन जातो असं मला वाटतं.
शाळेत असणारे आपले मित्र हे आपल्यासाठी अत्यंत स्पेशल असतात. त्यानंतर आपण कॉलेजला जातो, तिथे आपले आणखी काही नवीन मित्र होतात. फ्रेंडशिप डे आला कि शाळेत एकमेकांच्या हातावर फ्रेंडशिप बॅंड बांधायचे क्षण मला अजूनही आठवतात. मैत्री म्हणजे निस्वार्थ भावना असते. आनंदाच्या क्षणात सहभागी होणार आणि संकटांच्या काळात खांद्याला खांदा लावून सोबत असणारा हाच आपला खरा आणि जिवाभावाचा मित्र असतो. शाळेत असताना काही मित्रांशी ओळख झाली ती कायमचीच. मैत्री कायम राहावी म्हणून आम्ही एकाच कॉलेजमध्ये एकाच शाखेत प्रवेश घेतला. तिथेसुद्धा आम्ही एकाच बेंचवर बसून कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. कॉलेजचे लाईफ जगण्याचा आनंद घ्यायचा म्ह्णून अनेकदा लेक्चर्स बंक केली तर कधी दांडी मारून (अर्थात घरी न सांगता) फिरायला गेलो. कोकणात राहत असल्याने फिरायला कुठे जायचे हा प्रश्नच कधी आम्हला पडला नाही. खायला, प्यायला आणि फिरायलाच नव्हे तर एकमेकांच्या अडचणीत काळात देखील आम्ही आजही सोबत असतो.
मात्र कालांतराने पुढील शिक्षणासाठी मी पुण्यात आलो. नवीन कॉलेज, नवीन चेहरे आणि घरापासून इतक्या लांब आपले कसे होणार याची चिंता सतावत होती. मात्र पहिल्यापासूनच बोलका स्वभाव असल्याने कॉलेजच्या पहिल्याच दिवशी एका मुलाशी ओळख झाली आणि तो खूप जवळचा मित्र झाला. आमची मैत्री ही आमच्या वर्गात खुप प्रसिद्ध झाली. कोकणी आणि खान्देशच्या मुलाची चांगलीच गट्टी जमली. मग कालांतराने वर्गात आणखी काही मुलांशी ओळखी झाल्या. तसे आपण वर्गात सर्वांनाच ओळखत असतो. मात्र काहीच जण आपले खूप चांगले मित्र मैत्रिणी होऊन जातात. मुलींशी मैत्री केल्याने आपल्याला खूप साऱ्या गोष्टी समजतात. अर्थात आजही माझ्या मैत्रिणींना (किंवा ज्या ओळखीच्या असून केवळ कामानिमित्त माझ्याशी बोलतात) माझ्यासोबत फिरताना, बोलताना सुरक्षित वाटते ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. आपला स्वभाव चांगला असेल तर कोणताही व्यक्ती आपल्याशी चांगलेच वागतो हे वारंवार मला जाणवते.
हे झालं शाळा आणि कॉलेजचे. आता शिक्षण पूर्ण झाले आणि नोकरी सुरु झाली. असे म्हटले जाते की कार्पोरेट क्षेत्रात काम करता असताना ऑफिसमधल्या कलिग्सशी जास्त घट्ट मैत्री करू नये. (हे वाक्य मजेतच घ्यावे) मात्र असे मला कधीच वाटले नाही. हा आता जसे मी मगाशी म्हटले की आपल्या आयुष्यात येणार प्रत्येक जण आपल्याला चांगले-वाईट अनुभव देऊन जातात. अर्थात तसे काही वाईट अनुभव नक्कीच आले आणि अजूनही येतात. मात्र खऱ्या मित्रांपुढे आणि मैत्रीत अशा लोकांना जास्त महत्व द्यायचं नसते या नियमावर आपण पुढे जायचं असतं, असं मला वाटते.
मी आधी ज्या-ज्या ठिकाणी नोकरी करत होतो आणि आता ज्या ठिकाणी नोकरी करत आहे, तिथे माझे खूप चांगले मित्र आणि मैत्रिणी आहेत. मात्र पुण्यात आल्यावर माझ्या आयुष्यात असा एक मित्र आला की ज्याच्यामुळे मला स्वतःसाठी कसे जगायचे किंवा दुसऱ्यावर करण्याआधी आपण स्वतःवर प्रेम केले पाहिजे, समजले. जुन्या ऑफिसमधला एक सहकारी होता, त्याचे नाव यश वैद्य. मी मगाशी म्हटले की ऑफिसमध्ये कोणाशी जास्त वैयक्तिक माहिती शेअर करू नये, किंवा मैत्री फार घट्ट करू नये, असे म्हटले जाते. मात्र यश या सर्वाला अपवाद आहे. केवळ रील करणे, नवनवीन ठिकाणी खादाडी करायला जाणे, फिरणे इथपर्यंतच आम्ही मैत्री नाही तर, (माझ्या अन्य जिवाभावाच्या जिवलगांनी नाराज होऊ नये ही विनंती) एकमेकांच्या अडचणीत मदत करणे, खंबीर साथ देणे, चुकत असेल तर सावध करणे आणि चांगले काम केले तर मुक्तहस्ताने कौतुक करणे. खरे तर या सर्वांच्या पलीकडे गेली आहे आमची मैत्री. त्याच्या आणि माध्यमातून एकमेकांना खूप चांगल्या सवयी लावल्या. अर्थात त्याच्यामुळे मला व्यायाम करणे किंवा कामाच्या गडबडीत विसरून गेलेलो वाचनाची सवय पुन्हा लागली.
अर्थात माझ्या सांगण्याचा हेतू हाच आहे की, मैत्रीचे नाते अथांग आहे. माझ्या आयुष्यात माझ्या मित्रांचे स्थान सर्वोच्च आहे. मैत्री आपल्याला जगायला शिकवते. अर्थात आज फफ्रेंडशिप डे निमित्त माझ्या खूप जवळच्या माझ्या सर्व जिवाभावाच्या मित्र-मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. आपल्या मैत्रीचा वेल असाच बहरत जावो आणि त्याला कधीही कोणाची नजर ना लागो… म्हणूनच माझ्या जिगरी, काळजाचा तुकडा असणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींना फ्रेंडशिप-डे च्या खूप साऱ्या शुभेच्छा…