फोटो सौजन्य: iStock
नोव्हेंबरच महिना उजाडला की अनेक जण शेविंग करायचे बंद करून टाकतात. याचे कारण म्हणजे No Shave November कॅम्पेन. या महिन्यात अनेक तरुण या कॅम्पेनची स्टोरी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. पण लोकं नोव्हेंबरच्या महिन्यात का दाढी करत नाही याबद्दल तुम्हाला माहित आहे का?
नो शेव्ह नोव्हेंबर हल्ली खूप ट्रेंड होत आहे, पण या कॅम्पेन मागचे खरे कारण खूप कमी जणांना माहीत आहे. कित्येक जण तर फक्त फॅशन म्हणून हा ट्रेंड फॉलो करत असतात. चला या कॅम्पेन मागची गोष्ट जाणून घेऊया.
‘नो शेव्ह नोव्हेंबर’ ही एक अशी मोहीम आहे जी कॅन्सर, विशेषत: प्रोस्टेट कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी चालवली जाते. या काळात लोकं महिनाभर दाढी किंवा केस कापत नाहीत. त्याचा उद्देश केवळ केस वाढवणे हा नसून कॅन्सरविरुद्धच्या लढ्यात एकता दाखवणे आहे.
आता तुम्हाला प्रश्न तुम्हाला पडला असेल की केस न कापल्याने कॅन्सरच्या रुग्णांना कसा फायदा होतो वास्तविक, या मोहिमेचा उद्देश केवळ केस वाढवणे हा नसून, केस कापण्यासाठी आपण खर्च केलेला पैसा कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी दान करणे हा आहे. अशा प्रकारे हा कॅम्पेन केवळ जनजागृतीच करत नाही तर कॅन्सरशी लढा देत असलेल्या लोकांना पाठिंबाही देतो.
2009 मध्ये, मॅथ्यू हिल फाउंडेशन नावाच्या अमेरिकन गैर-सरकारी संस्थेने “नो शेव्ह नोव्हेंबर” मोहीम सुरू केली होती. कॅन्सरशी लढण्यासाठी निधी उभारणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेतून जमा होणारा पैसा कॅन्सरवर उपचार, प्रतिबंध आणि जनजागृतीसाठी काम करणाऱ्या विविध संस्थांना दिला जातो.
आता तुम्हाला समजले असेल की नोव्हेंबरमध्ये लोक दाढी का कापत नाहीत. पण आता अजून एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे या कॅम्पेनसाठी नोव्हेंबर महिनाच का निवडला गेला? चला याचे उत्तर जाणून घेऊया.
या मोहिमेची सुरुवात एका हृदयस्पर्शी कथेशी जोडलेली आहे. नोव्हेंबर 2007 मध्ये, शिकागो येथे राहणारे मॅथ्यू हिल यांचे कॅन्सरमुळे निधन झाले. आपल्या वडिलांच्या सन्मानार्थ, मॅथ्यूच्या आठ मुलांनी त्यांच्या काहीतरी खास करण्याचा निर्णय घेतला. कॅन्सरशी लढा देत असलेल्या इतरांना मदत करण्यासाठी त्यांनी ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहीम सुरू केली. त्यामुळे या मोहिमेसाठी नोव्हेंबर महिन्याची निवड करण्यात आली, जेणेकरून मॅथ्यूचे दरवर्षी स्मरण राहावे.