फोटो सौजन्य: iStock
कुठलाही पदार्थ असो, जर त्यात चवीनुसार मीठ नसेल तर तो पदार्थ रुचकर बनत नाही. पण मीठ फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर आपल्या शरीरातील सोडियमची मात्रा सुद्धा भरून काढतो. आपल्या शरीरासाठी मीठ खूप महत्वाचे आहे हे आपण सर्वेच जाणतो पण ते दिवसाला मीठ किती प्रमाणात खावे याची माहिती तुम्हाला आहे का? चला याबद्दल जाणून घेऊया.
जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच (WHO) ने नुकताच एक अभ्यास केला आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की जर आपण मीठ कमी खाल्ले तर हृदयविकार आणि किडनीशी संबंधित समस्या आपण टाळू शकतो. डब्ल्यूएचओचा विश्वास आहे की यामुळे पुढील 10 वर्षांत सुमारे 3 लाख लोकांचे प्राण वाचू शकतात.
जगातील अनेक देशांमध्ये लोक पॅकबंद खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात मीठ वापरत आहेत, ज्यामुळे आजार वाढत आहेत. भारतातही तेच घडत आहे. चला, या लेखात जाणून घेऊया की एका दिवसात आपण किती मीठ खाल्ले पाहिजे आणि त्याचे सेवन कमी करून अनेक रोगांचा धोका आपण कसा टाळू शकतो.
डब्ल्यूएचओच्या एका नवीन अभ्यासानुसार, दररोज 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाल्ल्यास पुढील 10 वर्षांत हृदयविकार आणि मूत्रपिंडाच्या तीव्र आजारामुळे सुमारे 3 लाख मृत्यू टाळता येऊ शकतात. हा अभ्यास द लॅन्सेट पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित झाला आहे. भारतात, एक व्यक्ती दिवसाला सरासरी 11 ग्रॅम मीठाचे सेवन करतो, जे जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. ति प्रमाणात मीठाचे सेवन हे हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर समस्यांचे प्रमुख कारण आहे.
आपले शरीर निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घेणे खूप गरजेचे आहे. आपल्याला समतोल आहारातून सर्व आवश्यक पोषक घटक मिळतात, परंतु आपण मीठ आणि तेलाचे सेवन कमी केले पाहिजे, कारण त्यांचे अतिसेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
एका अहवालानुसार, भारतीय जेवणात मीठाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 2014 मध्ये, भारतीयांनी स्वयंपाक करताना 80% पेक्षा जास्त सोडियम वापरले होते. मात्र, अलीकडच्या काळात पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांचा वापर वाढल्याने हे प्रमाण बदलत आहे. खारट स्नॅक्स आणि रेडी टू इट खाद्यपदार्थांची विक्री झपाट्याने वाढली असून त्यामुळे भारतीयांचे सोडियमचे प्रमाण देखील वाढत आहे.