फोटो सौजन्य - Social Media
कधी असा जोडपं पाहिलंय का, ज्यांना पाहून तुमच्या तोंडून सहजच निघालं असेल, “वा! काय सुंदर जोडी आहे!” त्यांच्या नजरेतील ओलावा, एकमेकांप्रती असलेला सन्मान आणि संवादातील प्रेम हे सगळं पाहणाऱ्यालाही भावून जातं. पण अशा नात्यांची जादू ही फक्त नशिबावर अवलंबून नसते, ती घडते काही खास सवयींमुळे.
एकमेकांसाठी वेळ द्या
आजच्या धावपळीच्या जीवनात, आपण फारच कमी वेळ आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी राखून ठेवतो. पण ‘क्वालिटी टाइम’ म्हणजे फक्त एकत्र बसणं नाही, तर मनमोकळ्या गप्पा, सोबत एखादी सैर किंवा सुसंवाद असावा. आठवड्यातून एकदा तरी एकत्र जेवण, एखादी मूव्ही किंवा कॉफीचा कप घ्या. नातं घट्ट होईल.
नेहमी कौतुक करा
आपल्याला एखादी गोष्ट चुकल्यास लगेच तक्रार करायची सवय असते, पण एखादी गोष्ट छान झाली तर आपण गप्प राहतो. ही सवय बदला. आपल्या जोडीदाराचं कौतुक करा. त्याच्या/तिच्या लूकचं, मेहनतीचं किंवा विचारांचं. ही गोष्ट नात्याला सकारात्मक बनवते.
मन मोकळं ठेवा
कुठल्याही नात्याचं खरं बळ म्हणजे संवाद. आपली भावना, चिंता, स्वप्नं हे सगळं आपल्या जोडीदारासोबत शेअर करा. त्यालाही ऐकून घ्या. हे केल्याने गैरसमज कमी होतील आणि विश्वास वाढेल.
परस्पर सन्मान ठेवा
प्रेमाइतकाच सन्मानही गरजेचा आहे. जोडीदाराच्या मतांचा आदर करा, त्यांना कमी लेखू नका. त्यांच्या स्वातंत्र्याला मान द्या. नात्यात आदर असेल तर प्रेम दीर्घकाळ टिकतं.
हसत-खेळत राहा
नातं म्हणजे फक्त जबाबदाऱ्या नाहीत. एकमेकांसोबत हसणं, मजा करणं देखील महत्त्वाचं आहे. विनोद, आठवणी, खेळ किंवा एकत्र काहीतरी मजेशीर करणे, यामुळे तणावही कमी होतो आणि नातंही नव्याने खुलतं.
या छोट्या पण प्रभावी सवयींमुळे तुमचं नातं केवळ टिकून राहत नाही, तर ते इतरांसाठीही प्रेरणादायी ठरतं. आजपासूनच या सवयी अंगीकारा आणि बना एक ‘हॅप्पी कपल’!