फोटो सौजन्य: iStock
होळी हा भारतातील रंगांचा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक देखील आहे. दुष्टावर सुष्टाच्या विजयाचे प्रतीक असलेला हा सण रंगांची उधळण करत जल्लोषात साजरा केला जातो. मित्रमैत्रिणी, कुटुंबे आणि अज्ञात व्यक्ती देखील एकत्र येत एकमेकांवर रंग उधळतात आणि या आनंदामध्ये सावधगिरी बाळण्याकडे दुर्लक्ष होते. पण, होळी सणादरम्यान रंगांची उधळण करताना दुर्लक्ष होणारा सर्वात महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे होळी खेळताना डोळ्यांची योग्य काळजी घेण्याची गरज. मानवी डोळा सर्वात संवेदनशील अवयव आहे आणि डोळ्यांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. रंगांमुळे डोळ्यांचे नुकसान होऊ शकते आणि दीर्घकालीन परिणाम देखील होऊ शकतात. म्हणून, सर्व वयोगटातील व्यक्तींनी सणाचा आनंद घेण्यासोबत डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे.
पहिले व सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांमध्ये रंग जाण्याला प्रतिबंध करण्यासाठी संरक्षणात्मक आय गिअरचा प्रकार म्हणून सनग्लासेस परिधान करा. बाजारपेठेत उपलब्ध बहुतेक रंग हे पारा, एस्बेस्टोस, सिलिका, अभ्रक, शिसे व औद्योगिक दर्जाच्या रंगांसारख्या विषारी, हानीकारक आणि कृत्रिम पदार्थांपासून बनवलेले असतात. त्यामुळे नेत्ररोग आणि त्वचेच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. सनग्लासेस परिधान करणे अवजड वाटत असेल तर टोपी परिधान करा, टोपीची रूंद कडा डोळ्यांमध्ये रंग जाण्यापासून संरक्षण करेल. रंगांमध्ये आढळणारे चमकदार लाल कण प्रत्यक्षात अभ्रक असतात आणि ते कॉर्नियाला देखील नुकसान पोहोचवू शकतात.
तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरात असाल तर होळी खेळताना नियमित चष्मे वापरण्याची खात्री घ्या, जे संरक्षणात्मक आयवेअर म्हणून काम करतील. लेन्सेस लावून होळी खेळत असाल तर रंग व रसायने कॉन्टॅक्ट लेन्समध्ये जाऊ शकतात, ज्यामुळे डोळ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच, रंगांनी भरलेल्या हातांसह डोळ्यांमधील लेन्सेस काढल्या तर लेन्सेसचे नुकसान होऊ शकते, तसेच प्रत्यक्ष डोळ्यांना संसर्ग देखील होऊ शकतात. खबरदारीचे उपाय म्हणून तुम्ही डोळ्यांच्या आसपासच्या भागांमध्ये काहीसे खोबरेल तेल वापरू शकता, ज्यामुळे त्वचेला वंगण मिळेल आणि रंग डोळ्यांमध्ये जाण्याला प्रतिबंध होईल.
केवळ पाण्याच्या सेवनाने शरीर हायड्रेट होते हा निव्वळ गैरसमज, क्रिकेटर ऋतुराज गायकवाडने दिला सल्ला
चुकून डोळ्यांमध्ये रंग गेले तर त्वरित कोमट पाण्याने डोळा स्वच्छ धुवा, कोणत्याही प्रकारच्या साबणाचा वापर करू नका, कारण त्यामुळे डोळ्यांमध्ये अधिक जळजळ होऊ शकते. तुमच्या डोळ्यांना अजूनही जळजळ, खाज सुटणे आणि सुजणे जाणवत असेल किंवा डोळे पाण्याने धुतल्यानंतरही योग्यरित्या दिसत नसेल तर विलंब न करता डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटा. डोळ्यांमध्ये जळजळ होत असेल आणि डोळे सुजलेले असतील तर डोळे चोळणे टाळा, कारण त्यामुळे जळजळ होऊ शकते आणि डोळ्यांमध्ये रंग पसरू शकतो, परिणामत: डोळ्यांच्या गंभीर समस्या जसे की नेत्रश्लेष्मलाशोथ किंवा कॉर्नियल अॅब्रशन होऊ शकतो. होळी उत्सवाचा आनंद घेताना होणाऱ्या कोणत्याही अॅलर्जिक प्रतिक्रियांसाठी अँटी-अॅलर्जिक औषधे सोबत ठेवा. खाज सुटणे, लालसरपणा, डोळ्यांना सूज येणे, त्वचेवर पुरळ येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही अॅलर्जीक प्रतिक्रियांची काही सामान्य लक्षणे आहेत, ज्यांकडे तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे.
होळी खेळण्याचा सर्वात सुरक्षित आणि पर्यावरणीयदृष्ट्या योग्य मार्ग म्हणजे विषारी रसायनांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करणे. बेसन, हळद, केशर, गुलाबाच्या पाकळ्या, पालक, बीट इत्यादी घरगुती घटकांचा वापर करून तुम्ही स्वतः रंग बनवू शकता. असे रंग तुमच्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यांवर डाग पडणार नाहीत आणि स्वच्छ धुतल्यानंतर ते सहजपणे निघून जातील. तसेच, त्यात बहुतेक दुकानातून खरेदी केलेल्या रंगांमध्ये आढळणारे कोणतेही हानीकारक आणि विषारी रसायने नसतात. तुमच्याकडे स्वतः रंग बनवण्यासाठी वेळ नसेल, तर फुलांच्या पाकळ्या, औषधी वनस्पतींचे अर्क आणि स्टार्च पावडर वापरून बनवलेले सेंद्रिय रंग खरेदी करा. सुरक्षितपणे व आनंदात होळी साजरी करा, स्वादिष्ट पाककलांचा आस्वाद घेण्यासोबत डोळ्यांची काळजी घेत वर्षातून एकदा येणाऱ्या रंगांच्या उत्सवाचा जल्लोषात आनंद घ्या.